प्रमोद जठारांनी 'त्यावेळी' राणेंवर केलेले आरोप खोटे होते काय? सतीश सावंतांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 18:45 IST2022-02-08T17:37:37+5:302022-02-08T18:45:39+5:30
प्रमोद जठार यांची अवस्था अडकीत्यात अडकलेल्या सुपारीसारखी

प्रमोद जठारांनी 'त्यावेळी' राणेंवर केलेले आरोप खोटे होते काय? सतीश सावंतांचा सवाल
कणकवली : प्रमोद जठार यांची अवस्था अडकीत्यात अडकलेल्या सुपारीसारखी झाली आहे. जशी आवळा सुपारी चघळून फेकून देतात तशीच गत जठार यांची झाली आहे. राणे यांचे समर्थन ते आता करीत आहेत. मात्र, राणे भाजप मध्ये येण्यापूर्वी त्यांनी त्यांच्यावर केलेले आरोप खोटे होते का? याचे उत्तर त्यांनी जनतेला द्यावे. असे आव्हान सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिले आहे.
भाजप प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी नितेश राणेंवर सूडबुद्धीने पोलिसांवर दबाव आणून राज्य सरकार कारवाई करत असल्याची टीका केली होती. या टीकेला सतीश सावंत यांनी कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, राजू राठोड , शहरप्रमुख चंद्रशेखर राणे, नगरसेवक कन्हैया पारकर, उपतालुकाप्रमुख राजू राणे, सिद्धेश राणे आदी उपस्थित होते.
सतीश सावंत म्हणाले, काँग्रेसमध्ये राणे कुटुंबीय असताना प्रमोद जठार यांनी स्वतः राणेंवर केलेली टीकात्मक विधाने आठवावीत. मात्र, आता प्रमोद जठार यांचा आत्मा रिफायनरीमध्ये अडकला आहे. त्यांना राणे कुटुंबियांवर प्रेम नसून ग्रीन रिफायनरी मार्गी लागावी यासाठी जठार प्रयत्न करत आहेत.
२०१४ च्या निवडणुकीत भाजपा कार्यालयात नितेश राणेंनी सोडलेल्या म्हशी जठार विसरले आहेत का? आता खासदारकीचे तिकीट स्वतःला मिळण्यासाठी जठार हे राणेंची तळी उचलत आहेत. संतोष परबवर १८ डिसेंबरला हल्ला झाला आणि त्यानंतर सचिन सातपुतेला अटक झाल्यानंतर त्याच्याकडून नितेश राणेंचे नाव या हल्ल्यात आले. त्यानंतर जिल्हा, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे कणकवली न्यायालयात शरण गेले.
न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्यांच्या छातीत दुखू लागले. संतोष परबवर हल्ला होऊन त्याला १८ टाके पडले. मात्र केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी त्याबाबत परबला फक्त खरचटले आहे, असे म्हटले होते. त्यामुळे नितेश राणेंना आता ऍसिडिटीमुळे छातीत दुखत असेल, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. जरी मी त्यावेळी राणेंसोबत होतो तरी अनधिकृत आंदोलनांच्यावेळी मी त्यांची साथ दिली नाही.
भाजप तालुकाध्यक्षाला झालेली मारहाण, चिखलफेक या सारख्या प्रकरणात मी त्यांच्या सोबत नव्हतो. जठार यांनी राणे विरोधात असताना त्यांच्यावर त्यावेळी केलेले आरोप खोटे होते काय ? तसे असेल तर आता जठार यांनी जनतेची जाहीर माफी मागावी, असेही सतीश सावंत म्हणाले.