कणकवली ते जानवली जोडणाऱ्या पुलाला लवकरच मंजुरी, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली माहिती
By सुधीर राणे | Updated: May 5, 2023 15:57 IST2023-05-05T15:55:58+5:302023-05-05T15:57:03+5:30
बांधकाम अभियंत्यांना या पुलाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे दिले निर्देश

कणकवली ते जानवली जोडणाऱ्या पुलाला लवकरच मंजुरी, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली माहिती
कणकवली : कणकवली आणि जानवली या दोन गावांना जोडणारा पूल लवकरच उभारला जाणार आहे. जानवली नदीवरील या पुलाचे अंदाजपत्रक तातडीने तयार करून पाठवा, असे निर्देश आम्ही बांधकाम विभागाला दिले आहेत. तर पुढील वर्षभरात कणकवली रेल्वे स्थानक परिसर विमानतळाच्या धर्तीवर विकसित होईल, अशी माहिती पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.
मंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी कणकवली नगरपंचायतीला भेट दिली. यावेळी त्यांनी शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आमदार नितेश राणे, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे ,माजी जिल्हापरिषद अध्यक्ष संदेश सावंत,संजय कामतेकर,महेश सावंत तसेच अन्य नगरसेवक व भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, कणकवली व जानवली ही गावे जोडण्यासाठी जानवली नदीवर गणपती सान्याजवळ मोठा पूल व्हावा. अशी अनेक वर्षांपासूनची मागणी होती. ती आता लवकरच पूर्णत्वास जाईल. बांधकाम अभियंत्यांना या पुलाचे अंदाजपत्रक तयार करायला सांगितले आहे. अंदाजपत्रक तयार झाल्यानंतर या पुलासाठी निधी उपलब्ध करून देणार आहोत.
कोकणात येणारा चाकरमानी किंवा पर्यटक यांचा प्रवास सुखाचा व्हावा. मोठ्या शहरांच्या धर्तीवर कोकणातही सुविधा मिळाव्यात यादृष्टीने कार्यवाही सुरू आहे. त्याअनुषंगाने महामार्ग चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. तसेच रेल्वे स्थानकांकडे जाणारे रस्तेही चांगल्या दर्जाचे तयार केले जाणार आहेत. सिंधुदुर्गातील प्रमुख रेल्वे स्थानकांचे अद्ययावतीकरण होणार आहे.
यामध्ये कणकवली रेल्वे स्थानक परिसर विमानतळाच्या धर्तीवर विकसित केला जाणार आहे. या कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला असून पुढील वर्षापर्यंत ही कामे पूर्ण होणार आहेत. दरम्यान, सिंधुदुर्गातील रस्ते आणि पर्यटन अनुषांगिक कामांच्या पूर्ततेला प्राधान्य देण्यात आल्याची माहितीही मंत्री चव्हाण यांनी दिली.