कारवाईचा अधिकार ‘हायकमांड’ला
By Admin | Updated: July 3, 2014 00:26 IST2014-07-03T00:23:11+5:302014-07-03T00:26:09+5:30
राजन तेली : नीतेश राणेंच्या टिकेला प्रसिद्धीपत्रकातून दिले उत्तर

कारवाईचा अधिकार ‘हायकमांड’ला
कणकवली : आम्ही कुठल्याही कंपनीचे एम्प्लॉईज नाही. आम्ही राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते आहोत. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहूल गांधी, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे आणि आमचे नेते नारायण राणे आहेत. आम्हाला बोलण्याचा, कारवाई करण्याचा आणि जाब विचारण्याचा अधिकार केवळ वरीष्ठ नेत्यांनाच आहे. अन्य कोणासही भाष्य करण्याचा अधिकार नाही, असा टोला माजी आमदार राजन तेली यांनी नीतेश राणे यांचे नाव न घेता प्रसिद्धीपत्रकातून हाणला आहे. त्यामुळे काँग्रेसअंतर्गत कुरघोडीचे राजकारण आगामी काळात पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
खासदार नीलेश राणे यांचा पराभव आप्तस्वकीयांमुळेच झाला. त्यात काही पक्षाचे नेते कॉन्ट्रॅक्टर झाले आहेत, असा घणाघाती आरोप नीतेश राणे यांनी मंगळवारी कणकवलीत पत्रकार परिषद घेवून केला होता. तसेच जर लोकांना राणेंना डावलून सावंत, तेली, कुडाळकर यांना आपले नेते बनवायचे असतील तर आमची काही हरकत नाही. आम्ही त्यांचे कार्यकर्ते म्हणून काम करू, असा टोलाही नीतेश यांनी हाणला होता.
त्यामुळे त्या वक्तव्याबाबत आता काँग्रेसच्या अन्य नेत्यांकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सर्व जिल्हावासीयांचे लक्ष लागून राहिले होते. नीतेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर याबाबत माजी आमदार राजन तेली यांनी प्रसिद्धीपत्रकातून प्रतिक्रिया व्यक्त केली.
दरम्यान, राजन तेली यांच्या या प्रतिक्रियेनंतर काँग्रेसअंतर्गत कुरघोडीच्या राजकारणाला वेग येणार आहे. याबाबत आता नारायण राणे कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)