वाईल्ड लाईफकडून कुत्र्याला जीवदान, डोक्यात अडकलेली बरणी काढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 14:43 IST2020-09-07T14:42:45+5:302020-09-07T14:43:41+5:30
ओरोस येथे एका भटक्या कुत्र्याच्या डोक्यामध्ये प्लास्टिकची बरणी अडकलेली होती. ती बरणी काढून त्याची त्यातून सुटका करण्याचे बहुमोल कार्य वाईल्ड लाईफ इमर्जन्सी रेस्क्यू सर्व्हिसेसच्या सदस्यांनी केले. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

वाईल्ड लाईफ इमर्जन्सी रेस्क्यू टिमने कुत्र्यावर उपचार केले.
आंबोली : ओरोस येथे एका भटक्या कुत्र्याच्या डोक्यामध्ये प्लास्टिकची बरणी अडकलेली होती. ती बरणी काढून त्याची त्यातून सुटका करण्याचे बहुमोल कार्य वाईल्ड लाईफ इमर्जन्सी रेस्क्यू सर्व्हिसेसच्या सदस्यांनी केले. त्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
जिल्हा परिषदेचे अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी प्राणीमित्र काका भिसे यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर वाईल्ड लाईफ इमर्जन्सी रेस्क्यू सर्व्हिसेसचे अध्यक्ष अनिल गावडे यांनी वेळ न दवडता त्वरित त्या कुत्र्याचा शोध घेतला.
पहिल्या दिवशी तो कुत्रा आढळला नाही. दुसऱ्या दिवशी स्वयंसेवकांसह पुन्हा त्यांनी शोध मोहीम राबवून त्याला ताब्यात घेतले. आनंद बांबर्डेकर, वैभव अमृस्कर, डॉ. प्रसाद धुमक, महेश राऊळ, नंदू कुपकर, सिद्धेश ठाकूर, दीपक दुतोंडकर आदी या शोध मोहिमेत सहभागी झाले होते.
जवळपास चार तास शोधमोहीम राबविल्यावर त्यांना तो कुत्रा कचरा डेपो येथे आढळून आला. त्यांनी त्या कुत्र्याला पकडले व त्याच्या डोक्यातील ती बरणी कटरच्या सहाय्याने कापून काढली. कुत्र्याच्या डोक्यात बरणी बरेच दिवस असल्याचे लक्षात आले. कारण कुत्रा अशक्त झाला होता. त्याच्या मानेला मोठ्या प्रमाणावर जखमाही झाल्या होत्या. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने अनिल गावडे यांनी त्या कुत्र्यावर उपचार करून पुन्हा त्याला सुरक्षितरित्या सोडून दिले.