अवघा सिंधुदुर्ग जिल्हा राममय!, मंदिरांमध्ये गर्दी
By सुधीर राणे | Updated: January 22, 2024 13:37 IST2024-01-22T13:36:00+5:302024-01-22T13:37:03+5:30
रामनामाचा जप, महाआरती, भजने, कीर्तनेही रंगली

अवघा सिंधुदुर्ग जिल्हा राममय!, मंदिरांमध्ये गर्दी
कणकवली : अयोध्येतील श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त कणकवली शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी मंदिरांमध्ये सकाळपासूनच धार्मिक विधी सुरु झाले आहेत. जिल्ह्यात सर्वत्र भक्तिभावाने भारलेले राममय वातावरण आहे.
दुपारी अयोध्येत राम मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना झाली तेव्हा जिल्ह्यातील मंदिरांमध्येही रामनामाचा जयघोष करण्यात आला. राम नामाचा जप चालू होता तसेच महाआरती, भजने, कीर्तनेही झाली. राज्य सरकारने सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याने भाविकांची मंदिरांमध्ये गर्दी दिसून आली. देवदर्शनासाठी अनेक मंदिरांमध्ये रांगा लागल्या होत्या.
कणकवली येथील अप्पासाहेब पटवर्धन चौकात ठाकरे सेनेतर्फे श्रीरामाच्या मूर्तीचे पूजन करून महाआरती करण्यात आली. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संदेश पारकर, सतीश सावंत, निलम सावंत, सुशांत नाईक, प्रमोद मसुरकर, शैलेश भोगले, रामदास विखाळे, वैदेही गुडेकर, माधवी दळवी, सोहम वाळके आदी उपस्थित होते.
तर नांदगाव येथेही मोठी रॅली काढण्यात आली. तसेच तिथे महाआरतीच्यावेळी आमदार नितेश राणे उपस्थित होते.यावेळी भाई मोरजकर,पंढरी वायंगणकर,भगवान लोके,ऋषिकेश मोरजकर आदी उपस्थित होते. दरम्यान, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी जिल्ह्यात सर्वत्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता.