रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ भाजपचाच, पक्ष देईल तो उमेदवार निवडून आणू - केंद्रीय मंत्री नारायण राणे
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: October 5, 2023 16:41 IST2023-10-05T16:40:17+5:302023-10-05T16:41:32+5:30
उमेदवारी कोणाला द्यायची हे पक्ष ठरवेल

रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ भाजपचाच, पक्ष देईल तो उमेदवार निवडून आणू - केंद्रीय मंत्री नारायण राणे
सिंधुदुर्ग : रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा लोकसभा मतदारसंघ भाजपचाच आहे. हा मतदार संघ भाजपच लढविणार आहे. पक्ष देईल तोच उमेदवार निवडून आणला जाईल अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री व भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना गुरुवारी सिंधुदुर्गनगरी येथे दिली.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदार संघावर शिवसेना शिंदे गट दावा करत असून किरण सामंत लोकसभेची उमेदवारी मागत आहेत. याबाबत पत्रकारांनी लक्ष वेधले असता नारायण राणे म्हणाले, या मतदारसंघात भाजपच आपला उमेदवार देणार आहे. पक्षाचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आपण लोकसभेला उभे राहणार का? या प्रश्नावर उत्तर देताना नारायण राणे म्हणाले. हा माझा प्रश्न नाही. उमेदवारी कोणाला द्यायची हे पक्ष ठरवेल असेही त्यांनी स्पष्ट केले.