राणेंनी ईडीच्या भीतीने आपला पक्ष किती दिवसात विलीन केला ते सांगावे!, वैभव नाईकांचे प्रत्युत्तर
By सुधीर राणे | Updated: May 29, 2023 16:53 IST2023-05-29T16:53:09+5:302023-05-29T16:53:37+5:30
..त्यामुळे त्यांनी आमच्या पक्षाची चिंता करू नये

राणेंनी ईडीच्या भीतीने आपला पक्ष किती दिवसात विलीन केला ते सांगावे!, वैभव नाईकांचे प्रत्युत्तर
कणकवली: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विलिनीकरणाबद्दल नितेश राणे बोलत आहेत. मात्र, त्यांनी ईडीच्या भीतीने आपला पक्ष भाजपात किती दिवसात विलीन केला हे प्रथम सांगावे असे प्रत्युत्तर आमदार वैभव नाईक यांनी दिले.
कणकवली येथे आज, सोमवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन करावा असा प्रस्ताव संजय राऊत यांनी दिला असल्याचे वक्तव्य केले होते. त्याला आमदार वैभव नाईक यांनी प्रत्युत्तर दिले.
नाईक म्हणाले, आमच्या पक्षाच्या विलीनीकरणाबाबत नितेश राणे बोलत आहेत. मात्र, त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत आपला नवीन पक्ष स्थापन केला. त्यांच्या पक्षाचा त्यांना एकही आमदार निवडून आणता आलेला नाही. तसेच तो पक्ष भाजपात विलीन करावा लागला. त्यामुळे त्यांनी आमच्या पक्षाची चिंता करू नये. त्यांनी आधी आपले भाजप मधील स्थान काय आहे? याचा विचार करावा. मंत्रीपद मिळावे म्हणून फक्त आमच्या पक्षावर टीका करीत राहू नये.
..त्यावेळी समजेल
आमच्या पक्षाचे नाव, आमदार, खासदार जरी गेले असले तरी जनता आमच्या सोबत आहे. आमच्या पक्षात शिवसैनिकांची दुसरी फळी निर्माण झाली आहे. तसेच पक्षाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अनेक आमदार निर्माण केले आहेत. त्यामुळे नितेश राणे यांनी आपल्या वरिष्ठांशी बोलून लवकरात लवकर विधानसभेची निवडणूक घ्यावी. त्यावेळी जनता नेमकी कोणासोबत आहे हे त्यांना समजेल. असेही वैभव नाईक म्हणाले.