Rane instigated 'pride' | राणेंनी ‘स्वाभिमान’ गुंडाळला
राणेंनी ‘स्वाभिमान’ गुंडाळला

कणकवली : भाजपमध्ये माझा लवकरच प्रवेश होईल. हा कार्यक्रम मुंबईतच होईल. मीच तशी इच्छा व्यक्त केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांवर माझा विश्वास आहे. कणकवली विधानसभेची जागा आमदार नीतेश राणे यांनाच मिळेल, असा विश्वास माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत नारायण राणे भाजपाच्या व्यासपीठावर जाणार की नाही, भाजपप्रवेशाबाबत काय निर्णय घेणार ? याबाबत सर्वांनाच उत्सुकता होती. महाजनादेश यात्रा सायंकाळी कणकवलीत दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे नारायण राणे यांनी स्वाभिमान कार्यालयासमोर स्वागत केले.
यावेळी त्यांचे दोन्ही सुपुत्र आमदार नीतेश राणे आणि माजी खासदार नीलेश राणे तसेच स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, उपाध्यक्ष रणजित देसाई, अशोक सावंत यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या भेटीनंतर मुख्यमंत्री थेट जाहीर सभेच्या ठिकाणी गेले.
राणे यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधत आपली पुढील भूमिका जाहीर केली. यात राणे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझा विश्वास आहे. दिलेला शब्द ते पाळतील.
लवकरच आपण मुंबईत आपल्या दोन्ही सुपुत्रांसह भाजपात प्रवेश करणार आहे. तसेच स्वाभिमान पक्षही भाजपमध्ये विलीन करणार आहे.

नीतेश राणे कमळ चिन्हावर लढतील
आपण भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कणकवली मतदार संघातील काँग्रेसचे विद्यमान आमदार नीतेश राणे हे कमळ चिन्हावर पुन्हा निवडणूक लढतील. आपण जेथे जाऊ तेथील पारडे जड असेल, असे म्हणत नारायण राणे यांनी राज्यात पुन्हा भाजपची निर्विवाद सत्ता येणार असल्याचेही सांगितले. तसेच भाजप आणि शिवसेनेची युती राहिल्यास शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करण्याबाबतच्या पत्रकारांच्या प्रश्नाला राणे यांनी यावेळी बगल दिली. त्याबाबतचा निर्णय नंतर घेईन, असेही राणे यांनी स्पष्ट केले.


Web Title: Rane instigated 'pride'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.