रात्री बरसला, सकाळनंतर ओसरला; सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची दमदार बॅटिंग
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: May 27, 2025 17:46 IST2025-05-27T17:44:07+5:302025-05-27T17:46:10+5:30
तीन तालुक्यात १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस

रात्री बरसला, सकाळनंतर ओसरला; सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची दमदार बॅटिंग
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात तुरळक पडणाऱ्या पावसामुळे पाऊस कमी झाला असे वाटत असतानाच सोमवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा जोर धरला. जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडला. मंगळवारी दुपारपर्यंत पावसाचा जोर होता. दुपारनंतर मात्र पुन्हा पावसाने काही काळ विश्रांती घेतल्याचे चित्र होते.
रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे विविध ठिकाणी नुकसान झाले आहे. देवगड, कणकवली आणि वेंगुर्ला तालुक्याला पावसाने झोडपून काढले. या तिन्ही तालुक्यामध्ये १०० मि.मी. पुढे पाऊस कोसळला आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात ९६.२५ च्या सरासरीने ७७० मि.मी पाऊस पडला आहे.
जिल्ह्यात रविवार व सोमवारी पावसाने विश्रांती घेत काही भागात उघडीप दाखविली होती. काही भागात सूर्यप्रकाशही पडला होता. काही भागात तुरळक पाऊस पडत होता. त्यामुळे पावसाचा जोर कमी झाला असे जिल्हावासीयांना वाटत होते. मात्र, सोमवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा एकदा जोर धरला. रात्री सुरू झालेला मुसळधार पाऊस सकाळपर्यंत कोसळत होता. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पुराची परिस्थिती निर्माण होते की काय असे वाटत होते.
नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. काही भागात पडझड होण्याचे सत्र कायम आहे.
मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात ९६.२५ च्या सरासरीने ७७० मी.मी पाऊस पडला आहे. यात दोडामार्ग ३४ मि.मी., सावंतवाडी ७२ मि.मी., वेंगुर्ला ११६ मि.मी., कुडाळ ८८ मि.मी., मालवण ८६ मि.मी., कणकवली १२८ मि.मी., देवगड १८० मि.मी. आणि वैभववाडी ६६ मि.मी. पाऊस पडला आहे.
देवगडात १८० मिलिमीटर पाऊस
प्रशासनाच्या आकडेवारीनुसार देवगड तालुक्यात तब्बल १८० मि.मी. पाऊस पडला आहे. त्या पाठोपाठ कणकवली १२८ मि.मी तर वेंगुर्ला तालुक्यात ११६ मि.मी. पाऊस पडला आहे.