सिंधुदुर्गात पावसाची संततधार सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 17:54 IST2019-09-04T17:45:35+5:302019-09-04T17:54:26+5:30
श्रावण मासाच्या समाप्तीनंतर अमावास्येला दाखल झालेल्या पावसाने गेल्या चार दिवसात आपला जोर कायम ठेवला आहे. मंगळवारी रात्रीपासून संपूर्ण जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असल्याने बुधवारी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.

सिंधुदुर्गात पावसाची संततधार सुरूच
सिंधुदुर्ग : श्रावण मासाच्या समाप्तीनंतर अमावास्येला दाखल झालेल्या पावसाने गेल्या चार दिवसात आपला जोर कायम ठेवला आहे. मंगळवारी रात्रीपासून संपूर्ण जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असल्याने बुधवारी पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.
जिल्ह्यातील घराघरात गणेशोत्सव सुरू आहे. यावर्षी ऐन गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला पाऊस सक्रीय झाला असल्याने भाविकांच्या आनंदावर विरजण पडले आहे. जिल्ह्यात सर्वच ठिकाणी मोठ्या संख्येने मुंबईकर चाकरमानी दाखल झाले असल्याने उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, सतत पडत असलेल्या पावसाने भाविकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
पाऊस चार हजारांचा टप्पा गाठणार
गेल्या तीन ते चार दिवसात सिंधुदुर्गात पुन्हा पाऊस सक्रीय झाल्याने आतापर्यंत पावसाने सरासरी ३८00 मिलिमीटरचा टप्पा गाठला आहे. आणखीन दोन दिवसांत पाऊस ४000 मिलिमीटरचा टप्पा पार करेल.
कोकण रेल्वेचे वेळापत्रकही कोलमडले
संततधार पाऊस आणि गणेशोत्सवानिमित्त सोडण्यात आलेल्या जादा रेल्वेगाड्यांमुळे कोकण रेल्वेवरील सर्वच गाड्यांचे वेळापत्रक पुरते कोलमडले आहे. प्रत्येक गाडी दोन ते तीन तास उशिराने धावत आहे. त्यामुळे चाकरमान्यांसह प्रवाशांना अडचणी निर्माण होत आहेत.