मनाई फलक ठरताहेत बाधक
By Admin | Updated: July 14, 2014 23:36 IST2014-07-14T23:25:23+5:302014-07-14T23:36:21+5:30
पर्यटकांमध्ये संभ्रमावस्था : उन्नेयी बंधारा पर्यटन स्थळावरील प्रकार

मनाई फलक ठरताहेत बाधक
वैभव साळकर- दोडामार्ग ,दोडामार्ग तालुक्यात पर्यटन स्थळ म्हणून नावारूपाला येत असलेल्या आणि पर्यटकांच्या पसंतीस उतरलेल्या तेरवण- मेढे उन्नेयी बंधारा पर्यटन स्थळावर तिलारी प्रकल्पाने लावलेले ‘प्रवेश मनाई’चे फलक पर्यटकांसाठी डोकेदुखी बनले आहेत. पर्यटनस्थळाच्या दोन्ही बाजूंच्या प्रवेशद्वारांवर लावण्यात आलेल्या ‘धरण परिसरात खासगी व्यक्तींना प्रवेश मनाई या सूचना फलकाने पर्यटकांत कमालीची संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. काही पर्यटकांना चुकीच्या फलकामुळे पर्यटनस्थळाला भेट न देताच माघारी परतावे लागत आहे. त्यामुळे तिलारी प्रकल्पाने तेथील फलकात सुधारणा करणे आवश्यक आहे.
तालुक्यातील पर्यटनस्थळामध्ये सर्वप्रथम तिलारी मुख्य धरण व त्यापाठोपाठ तेरवण- मेढे उन्नेयी बंधारा पर्यटन स्थळांकडे पाहिले जाते. तेरवण- मेढे उन्नेयी बंधारा पर्यटन स्थळाची तिलारी प्रकल्पानेच काही वर्षापूर्वी निर्मिती केली. तिलारी नदीवर तेरवण- मेढे येथे बंधारा बांधून त्या बंधाऱ्यांच्या ठिकाणी छोटा जलविद्युत प्रकल्प कार्यान्वीत केला आहे. महाराष्ट्रातील सर्वात छोटा जलविद्युत प्रकल्प म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जाते. याच बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूने लाखो रूपये खर्ची करून तिलारी प्रकल्पाने बगिच्यांची निर्मिती केली.
त्यामुळे अगोदरच निसर्ग सौंदर्याने नटलेल्या तेरवण-मेढे बंधाऱ्यावर पर्यटनाला अधिक चालना मिळाली. गेल्या चार ते पाच वर्षात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटनाचा ओढा निर्माण झाला आहे. विशेषत: गोव्यात येणाऱ्या परदेशी पर्यटकांनाही या निसर्गाने नटलेल्या बंधाऱ्याने भूरळ घातली.
गोवा राज्यातील पर्यटकांबरोबरच बेळगाव, कर्नाटक, कोल्हापूर आदी ठिकाणचे पर्यटकही गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात या पर्यटन स्थळाला भेट देत आहेत. हत्तींच्या आगमनानंतर संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झालेल्या दोडामार्ग तालुक्यातील ही पर्यटन स्थळेही नावारूपास आली. गेल्या काही वर्षात या पर्यटन स्थळांवर मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. मात्र, याच पर्यटनस्थळाच्या दोन्ही बाजूंच्या प्रवेशद्वारांवर तिलारी प्रकल्पाने गतवर्षी निषिद्ध क्षेत्र- खासगी व्यक्तींना धरण परिसरात प्रवेश करण्यास सक्त मनाईचे सूचना फलक उभारले आहेत.