जनसंपर्कासाठी खासगी एजन्सी

By Admin | Updated: July 16, 2014 00:25 IST2014-07-16T00:20:30+5:302014-07-16T00:25:24+5:30

नीतेश राणे : कणकवली नगरपंचायतीच्या कामकाजाचा आढावा

Private agency for public relations | जनसंपर्कासाठी खासगी एजन्सी

जनसंपर्कासाठी खासगी एजन्सी

कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्यावतीने करण्यात येणाऱ्या विकासकामांबाबत जनतेला माहिती देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करण्याबरोबरच खासगी एजन्सी नेमण्यात येईल. तसेच शहरातील तरुणांच्या संख्येचा विचार करता शहरात ‘वायफाय’ सेवा सुरु करण्याचा नगरपंचायतीचा प्रयत्न आहे. आगामी कालावधीत नगरपंचायतीचे काम प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जनसंपर्क वाढविण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रांतिक सदस्य नीतेश राणे यांनी दिली.
कणकवली नगरपंचायतीला मंगळवारी नीतेश राणे यांनी भेट देऊन विकासकामांबाबत आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा अ‍ॅड. प्रज्ञा खोत, नगरसेवक किशोर राणे, मेघा गांगण, कन्हैय्या पारकर, रुपेश नार्वेकर, बंडू हर्णे, अभिजीत मुसळे, अण्णा कोदे, प्रा. दिवाकर मुरकर, माधुरी गायकवाड, माया सांब्रेकर, सुविधा साटम, सुमेधा अंधारी, गौतम खुडकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदेश सावंत, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष संदीप मेस्त्री, अभय राणे, संजय मालंडकर आदी उपस्थित होते.
यावेळी नीतेश राणे म्हणाले, नगरपंचायतीचे काम लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी काय प्रयत्न करता येतील याबाबत नगरसेवकांशी चर्चा केली. नगरपंचायतीचे काम अधिकाधिक सक्षम बनविण्याचा प्रयत्न आहे. साफसफाईचे काम शहरात सुरु असून नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी नगरपंचायतीचे प्रयत्न सुरु आहेत. गतवर्षी नगरपंचायतीला भेट दिल्यानंतर जनता दरबार घेण्याच्या सूचना नगरसेवकांना दिल्या होत्या. त्यानंतर एकदा जनता दरबार झाला. तर दोनवेळा प्रभागनिहाय बैठकाही घेण्यात आल्या. मात्र, त्यानंतर आचारसंहिता असल्याने जनता दरबार होऊ शकला नाही. नगरपंचायतीच्या माध्यमातून जनतेची कामे करण्यास आम्ही कमी पडलो असे वाटत असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो. परंतु जास्तीत जास्त लोकाभिमुख काम करण्याचा आगामी काळात नगरपंचायतीचा प्रयत्न राहणार आहे. आचरा रस्त्यावर तुंबणाऱ्या पाण्यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी संयुक्त बैठक लवकरच घेण्यात येईल, असेही राणे यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Private agency for public relations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.