जन्मोजन्मी हीच पत्नी मिळू दे म्हणत मारल्या वडाला फेऱ्या, कुडाळात पुरुषांची आगळीवेगळी वटपौर्णिमा
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: June 10, 2025 19:25 IST2025-06-10T19:25:18+5:302025-06-10T19:25:46+5:30
रजनीकांत कदम कुडाळ : पत्नीच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन हीच पत्नी जन्मोजन्मी मिळावी, तिला चांगले आरोग्य मिळावे, यासाठी कुडाळ-गवळदेव ...

जन्मोजन्मी हीच पत्नी मिळू दे म्हणत मारल्या वडाला फेऱ्या, कुडाळात पुरुषांची आगळीवेगळी वटपौर्णिमा
रजनीकांत कदम
कुडाळ : पत्नीच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन हीच पत्नी जन्मोजन्मी मिळावी, तिला चांगले आरोग्य मिळावे, यासाठी कुडाळ-गवळदेव मंदिर येथे पुरुषांनी वडाची पूजा करत वडाला सात फेरे मारून आगळीवेगळी वटपौर्णिमा साजरी केली. अशी वटपौर्णिमा साजरी करण्याचे आयोजन सलग १६ व्या वर्षी करण्यात आले होते.
‘जन्मोजन्मी हाच पती मिळावा, पतीला चांगले आरोग्य मिळावे’ यासाठी महिला दरवर्षी वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास करतात, तसेच वडाची मनोभावे पूजा करून व वडाला सात फेऱ्या मारून वटपौर्णिमा सण साजरा करतात.
कुडाळ येथे मात्र गेल्या १६ वर्षांपासून एक वेगळी संकल्पना राबविली जात आहे. कुडाळमधील बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर व डॉ. संजय निगुडकर यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम गेली १६ वर्षे अविरतपणे चालू आहे. कुडाळमधील श्री गवळदेव येथे पुरुषांनी वडाच्या झाडाभोवती सात फेऱ्या मारून सूत गुंडाळले व आपल्या पत्नीला चांगले आरोग्य व दीर्घायुष्य लाभावे, अशी भावना यावेळी पुरुष मंडळींनी व्यक्त केली.
मनोभावे वडाची पूजा
पत्नी आपल्या पतीसाठी अनेक त्याग करते, तिच्या सहकार्यामुळेच आपण यशस्वी होतो. त्यामुळे पत्नीचे आरोग्य चांगले रहावे व जन्मोजन्मी आपल्याला हीच पत्नी मिळावी, याकरिता पतीदेव कुडाळ-गवळदेव मंदिर येथील वडाची पूजा करतात. यावेळी उमेश गाळवणकर, प्रा. अरुण मर्गज, राजू कलिंगण, परेश धावडे, प्रसाद कानडे, सुरेश वरक, बळीराम जांभळे, अजय भाईप, ज्ञानेश्वर तेली, सुनील गोसावी, महादेव परब, ओंकार कदम, नितीन बांबर्डेकर आदी उपस्थित होते.