कोळोशीमध्ये महिनाभरापासून विजेचा लपंडाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 15:27 IST2020-08-03T15:24:58+5:302020-08-03T15:27:25+5:30
कोळोशी गावातील अनियमित वीजपुरवठा नियमित करण्यात यावा. अन्यथा आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल, असे निवेदन कोळोशी सरपंच रितिका सावंत यांनी कणकवली येथे वीज वितरणच्या कार्यकारी अभियंता यांना दिले आहे.

कोळोशी गावातील अनियमित वीजपुरवठा नियमित करण्यासाठी सरपंच रितिका सावंत यांनी वीज वितरण कार्यालयाला लेखी निवेदन दिले.
तळेरे : कोळोशी गावामध्ये गेल्या महिनाभरापासून विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा वितरणावर मोठा परिणाम झालेला आहे. तसेच इतर समस्या निर्माण झाल्या आहेत. अनियमित वीजपुरवठा नियमित करण्यात यावा. अन्यथा आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल, असे निवेदन कोळोशी सरपंच रितिका सावंत यांनी कणकवली येथे वीज वितरणच्या कार्यकारी अभियंता यांना दिले आहे.
गावातील वीज वितरणच्या अन्य समस्यांबाबत कोळोशी ग्रामपंचायतीकडून लेखी निवेदन देऊन लक्ष वेधण्यात आले. विजेचा प्रश्न सोडविण्याची मागणी करण्यात आली. वीज वितरणच्या कणकवली येथील कार्यालयात उपकार्यकारी अभियंता यांच्याशी चर्चा करण्यात आली.
अनियमित वीज वितरणामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्या समस्या सोडवाव्यात, अशी मागणी केली . यावेळी सरपंच रितिका सावंत यांच्यासह उपसरपंच संजय पेडणेकर, ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ कदम, वैशाली इंदप, सानिका इंदप, सान्वी चव्हाण व ग्रामसेवक मंगेश राणे आदी उपस्थित होते.
आगामी उत्सवाचे दिवस
आता श्रावणमास सुरू आहे. त्यातील नागपंचमी, रक्षाबंधन सण झाला. आता गोकुळाष्टमी व त्यानंतर गणेशोत्सव असणार आहे. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांत विजेची मागणी वाढणार असल्याने याबाबत योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. असे या निवेदनकर्त्यांनी वीज वितरणच्या अधिकाऱ्यांना सांगितले.