लेखी आदेशानंतर उपोषण स्थगित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 16:20 IST2021-04-06T16:17:52+5:302021-04-06T16:20:52+5:30
Grampanchyat sindhudurg- ग्रामपंचायतीमध्ये कामावर हजर करून घेण्याचे लेखी आदेशाचे पत्र गटविकास अधिकारी यांनी दिल्यानंतर मोंड येथील सुभाष विकास तांबे यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर सोमवारी कुटुंबीयांसमवेत सुरू केलेले उपोषण स्थगित केले.

लेखी आदेशानंतर उपोषण स्थगित
देवगड : ग्रामपंचायतीमध्ये कामावर हजर करून घेण्याचे लेखी आदेशाचे पत्र गटविकास अधिकारी यांनी दिल्यानंतर मोंड येथील सुभाष विकास तांबे यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर सोमवारी कुटुंबीयांसमवेत सुरू केलेले उपोषण स्थगित केले.
मोंड ग्रामपंचायत कार्यालयामध्ये शिपाई कर्मचारी पदावर कार्यरत असलेल्या सुभाष विश्राम तांबे यांनी या पदावर हजर करून घेत नसल्याबाबत कुटुंबीयांसमवेत पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचे पत्र गटविकास अधिकारी यांना दिले होते. त्यानुसार सोमवारी तांबे हे पत्नी व मुलीसमवेत उपोषणाला बसले.
त्यांनी गटविकास अधिकारी यांना दिलेल्या पत्रात, आकृतिबंधात शिपाई हे पद देऊन ग्रामपंचायतीने फसवणूक केली. ग्रामपंचायतीचे काम करीत असताना दुचाकीचा अपघात होऊन पायाला दुखापत झाली होती. पायाची दुखापत झाल्यानंतर कार्यालयात हजर करून घेण्याबाबत अर्ज सादर केला. जिल्हा रुग्णालयाचे शिपाई कर्मचारी पदावर काम करण्यास सक्षम असल्याचे पत्रही दिले. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष संतोष किंजवडेकर, महेंद्र माणगावकर व मोंडमधील ग्रामस्थ उपस्थित होते.
मोंड ग्रामपंचायतीकडून अन्याय झाल्याचा आरोप
ग्रामपंचायत प्रशासनाने शिपाई हे पद आकृतिबंधात नसल्याने हजर करून घेण्याचा प्रश्नच नाही, असे पत्र दिले. ग्रामपंचायतीने शिपाई पद देऊन फसवणूक केली. या झालेल्या अन्यायाबाबत न्याय मिळावा यासाठी वारंवार मागणी करूनही न्याय न मिळाल्याने गटविकास अधिकारी कार्यालयासमोर सोमवारी त्यांनी कुटुंबीयांसमवेत उपोषण सुरू केले. अखेर सभापती रवी पाळेकर, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, सहायक पोलीस निरीक्षक संजय कातिवले यांच्या उपस्थितीत मोंड ग्रामपंचायतीने तांबे यांना तत्काळ कामावर हजर करून घ्यावे, असे लेखी पत्र दिल्यानंतर त्यांनी उपोषण स्थगित केले.