रत्नागिरी : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात शिवसेना उद्या (गुरुवार दि. १९ मार्च २०१५) जैतापूर प्रकल्पस्थळाऐवजी कुवारबाव रत्नागिरी येथील अणुऊर्जा प्रकल्पाच्या मुख्य कार्यालयावरच मोर्चाद्वारे धडक देणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे या आंदोेलनाकडे लक्ष लागले आहे. शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद या आंदोेलनाला असल्याने आंदोलन चिघळणार नाही, याची काळजी पोलिसांकडून घेतली जात आहे. या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडूू नये म्हणून जमावबंदी व प्रवेश मनाई जारी करण्यात आली असून, कुवारबाव परिसराला पोलीस छावणीचे रूप आले आहे. शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली गुरुवारी होणाऱ्या या आंदोेलनाची जय्यत तयारी गेल्या चार दिवसांपासून जशी शिवसेनेकडून होत आहे, तशीच हे आंदोलन हाताळण्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी पोलीस व जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. त्यासाठीच कुवारबाव रेल्वेस्थानक फाटा येथे असलेल्या अणुऊर्जा प्रकल्प कार्यालयाच्या (एनपीसीएल) सभोवती पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच कुवारबाव महाराष्ट्र बॅँक ते रेल्वे फाटा आणि तेथून रेल्वे स्थानकापर्यंतच्या रस्त्याच्या कडेला एका बाजूने बांबूंचे दुहेरी कुंपण घालण्यात आले आहे. या कुंपणाच्या आत प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मार्गावर ठिकठिकाणी बॅरिकेटस् लावली आहेत. आंदोलक हे गुरुवारी सकाळी १० वाजता जमणार असलेल्या आंबेडकर भवनाच्या आवारात पोलिसांची मोठी कुमक तैनात आहे. सशस्त्र पोलीस दलालाही पाचारण करण्यात आले आहे. चार वर्षांपूर्वीच्या जैतापूर आंदोलनाच्यावेळी शिवसेनेने गनिमी काव्याचा अवलंब केला होता. त्यामुळे पोलिसांचीही दमछाक झाली होती. त्यामुळे यावेळी शिवसेना नेत्यांच्या बैठकांकडे, त्यांच्याकडूून कार्यकर्त्यांना मिळणाऱ्या संदेशांकडेही पोलिसांची नजर आहे. कुवारबाव, शांतीनगर, नाचणे, खेडशी, मिरजोळे परिसरात पोलीस गस्त घालत आहेत. आंदोलन यशस्वी करण्यासाठी शिवसेना नेत्यांनीही त्यांची खास रणनिती ठरवल्याची चर्चा असून, गुरुवारी काय होणार याचीच चर्चा आहे. (प्रतिनिधी)जमावबंदी, प्रवेश मनाई आदेश जारी1कुवारबाव अणुऊर्जा कार्यालय परिसर, नाटे पोलीस स्थानक परिसर, माडबन येथील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प परिसरात जमावबंदी, प्रवेशबंदी.2राजापूर उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय परिसरात एस. टी. स्टॅँड वगळून जमावबंदी, प्रवेश मनाई आदेश जारी.3जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांच्याकडून १४४ (३) अन्वये जमावबंदी, प्रवेश मनाई आदेश लागू. 4कायद्याचा अवमान करणाऱ्यांवर कडक कारवाईचे जिल्हा पोलीस अधीक्षकांचे आदेश.5रत्नागिरी-कुवारबाव ते हातखंबापर्यंत पोलिसांचा जागता पहारा, येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी. बस मार्ग बदललारत्नागिरी शहरी व ग्रामीण बस स्थानकातून रेल्वे स्थानकापर्यंत रेल्वे फाट्यावरून होणाऱ्या बस वाहतुकीचा मार्ग गुरुवारच्या आंदोलनामुळे बदलण्यात आला आहे. ही वाहतूक गुरुवारी दिवसभर रत्नागिरी ते टीआरपीमार्गे हॉटेल कांचनकडून रेल्वे कॉलिनी रस्त्याने रेल्वेस्थानकापर्यंत जाणार आहे. याच मार्गाने परत रत्नागिरी बस स्थानकाकडे वाहतूूक होणार आहे.
कुवारबाव बनले पोलीस छावणी !
By admin | Updated: March 18, 2015 23:58 IST