ओरोस : अवकाळी पाऊस व प्रतिकूल हवामानामुळे आंबा व काजू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने नुकसानभरपाई जाहीर करावी, या मागणीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बागायतदार शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. शेतकरी नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. तसेच १० दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास २३ रोजी महामार्गावर चक्कजाम करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.मोर्चाची सुरुवात ओरोस फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर ओरोस फाटा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, सुशांत नाईक, बाबूराव धुरी यांच्यासह जिल्ह्यातील विविध भागांतील आंबा व काजू बागायतदार हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते.अवकाळी पावसामुळे आंबा मोहोर गळणे, काजू उत्पादन घटणे, तसेच बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून बागायतदारांना योग्य नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी मोर्चातून करण्यात आली.मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडे सादर केले. आंबा व काजू बागायतदारांना न्याय मिळावा आणि त्यांच्या नुकसानीची शासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
विम्याची मुदत वाढावी, कर्जमाफी करावीमोर्चाला संबोधित करताना शेतकरी नेते राजू शेट्टी म्हणाले, १६ लाख कोटी रुपयांची उद्योगपतींची कर्जे सरकारकडून माफ केली जातात आणि दोन अडीच हजार कोटी रुपये आपल्या आंबा, काजू उत्पादकाला सरकार देऊ शकत नाही, हे दुर्दैव आहे. या आंबा उत्पादकांनी जगाच्या बाजारपेठेत राज्याची आणि देशाची ताठ मान केली आहे. सिंधुदुर्गच्या आंब्याची जगात ख्याती आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या आंब्याला हेक्टरी ५ लाख रुपये आणि काजूला हेक्टरी ३ लाख रु. नुकसानभरपाई मिळाली पाहिजे. तसेच विम्याची मुदत वाढावी आणि कर्जमाफी झाली पाहिजे, अशा आमच्या मागण्या आहेत....तर २३ मार्च रोजी महामार्गावर ‘चक्कजाम’पुढील १० दिवसांत सरकारने आपल्या मागण्या पूर्ण कराव्यात. या १० दिवसांत अडचणीत सापडलेल्या आंबा, काजू उत्पादकाला सरकारने मदत केली नाही तर २३ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता नांदगाव येथे मुंबई-गोवा हायवेवर चक्काजाम आंदोलन केले जाणार असल्याचे यावेळी शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.कडक पोलिस बंदोबस्तमोर्चाच्या पार्श्वभूमीवर ओरोस फाटा ते जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने तैनाती करण्यात आली होती. वाहतुकीचे नियोजन करण्यात येत मोर्चा शांततेत पार पडावा, यासाठी पोलिस प्रशासनाकडून विशेष दक्षता घेण्यात आली.
Web Summary : Sindhudurg's mango and cashew farmers, led by Raju Shetti, protested at the Collector's office, demanding compensation for crop losses due to unseasonal rains. They threaten a highway blockade if demands aren't met in 10 days. Farmers demand increased insurance coverage and loan waivers.
Web Summary : सिंधुदुर्ग के आम और काजू किसानों ने राजू शेट्टी के नेतृत्व में फसल नुकसान के मुआवजे की मांग करते हुए कलेक्टर कार्यालय पर प्रदर्शन किया। उन्होंने 10 दिनों में मांगें पूरी न होने पर राजमार्ग অবরোধ करने की धमकी दी। किसानों ने बीमा कवरेज बढ़ाने और ऋण माफी की मांग की।