स्वार्थी पक्षबदलू राजकारण्यांना जनतेने धडा शिकवावा, मनसे सरचिटणीस परशुराम उपरकरांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 17:45 IST2022-02-08T17:45:05+5:302022-02-08T17:45:23+5:30
त्यावेळी राणेंच्या दहशतीचे समर्थन करून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणारे आजच्या घडीला त्यांच्यावर टिकाटिपणी करत आहेत.

स्वार्थी पक्षबदलू राजकारण्यांना जनतेने धडा शिकवावा, मनसे सरचिटणीस परशुराम उपरकरांचे आवाहन
कणकवली : कोकण भूमीत जे उन्मत्त होतात ते या परशुराम भूमीत गाडले जातात. राणे काँग्रेसमध्ये असताना त्यांच्या समर्थकांनी शिवसैनिकांना मारझोड करण्याबरोबरच बाहेरून आणलेल्या गुंडांकडून दहशतही पसरवली होती. त्यावेळी जुन्या प्रामाणिक काँग्रेस कार्यकर्त्यानी पक्ष बदलला तर काहींनी कायमचेच राजकारण सोडले.
मात्र, त्यावेळी राणेंच्या दहशतीचे समर्थन करून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणारे आजच्या घडीला त्यांच्यावर टिकाटिपणी करत आहेत. ही टीका करणारे त्यावेळी गायब झालेल्या व्यक्तींमागचे गूढ सांगतील काय ? असा सवाल करत स्वार्थी पक्षबदलू राजकारण्यांना जनतेने मतांच्या माध्यमातून धडा शिकवावा असे आवाहन मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केले आहे. कणकवली तेलीआळी येथील मनसे संपर्क कार्यालयात आज, मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
परशुराम उपरकर म्हणाले, काही जण आता आत्मक्लेश करीत आहेत. मात्र, त्यावेळी नितेश राणेंच्या विजयासाठी स्वतः त्यांनी किती प्रयत्न केले, याचेही चिंतन करावे. प्रमोद जठार आज नारायण राणे, नितेश राणेंचे गोडवे गात उदोउदो करत आहेत. मात्र, आपल्या आमदारकीच्या निवडणुकीच्यावेळी ते त्यांच्यावर कोणते आरोप करीत होते. याचा त्यांनीच विचार करावा.
कोकणातील जनतेला फसवण्याचा प्रयत्न करणारे सोयीनुसार व आपल्या वैयक्तिक फायद्यानुसार पक्षबदल करून एकमेकांवर टीका करीत असतात. मात्र, स्वतःच्या स्वार्थासाठी कोणी जिल्हा बँक अध्यक्ष तर कोणी महामंडळाचे उपाध्यक्ष पद मिळवणारे त्यावेळी राणेंचे गोडवे गात होते.
त्यामुळे सिंधुदुर्गातील जनतेने एकमेकांवर टीका करणाऱ्या स्वार्थी राजकारण्यांना मतांच्या माध्यमातून धडा शिकवला पाहिजे. कोकण ही परशुरामाची भूमी असून या भूमीत जे करायचे ते इथेच फेडायचे आहे. याचा विचार सर्वांनीच करून तसे वागावे आणि जनहित साधण्यासाठी प्रयत्न करावेत असेही परशुराम उपरकर यावेळी म्हणाले.