आंब्रडमध्ये ऊस जमीनदोस्त

By Admin | Updated: July 18, 2014 22:55 IST2014-07-18T22:51:02+5:302014-07-18T22:55:33+5:30

तेरा हेक्टरमध्ये हानी : दहा शेतकऱ्यांचे नुकसान

Peel the sugarcane in Amber | आंब्रडमध्ये ऊस जमीनदोस्त

आंब्रडमध्ये ऊस जमीनदोस्त

कुडाळ : तालुक्यात झालेल्या जोरदार वादळवारा व मुसळधार पावसामुळे आंब्रड पंचक्रोशीतील १३ हेक्टरमधील ऊस जमीनदोस्त झाला आहे. यामुळे १० शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
कुडाळ तालुक्यात गेले दोन ते तीन दिवसात झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी पडझड होऊन शेती पाण्याखाली जाऊन जनतेची मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली आहे. त्याचप्रमाणे आंब्रड पंचक्रोशीमध्ये लावलेला ऊस मुसळधार पावसामुळे जमीनदोस्त झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आंब्रड पंचक्रोशीमध्ये शेतकऱ्यांनी उसाची लागवड केली आहे. या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात जोमाने ऊस वाढला होता. परंतु पावसात तो ऊस टिकाव धरू शकला नाही. वाढत्या वादळी वाऱ्यामुळे ऊस जमीनदोस्त झाला आहे. यामध्ये चंद्रकांत काळप, भिकाजी लाड, अरुण काबरे, वासुदेव सावंत, विजय गरूड, पांडुरंग चव्हाण, महादेव सावंत, नारायण राऊळ, भास्कर बाबाजी राऊळ, रमाकांत मुंज, पंढरी देवळी, नारायण यशवंत राऊळ, अरुण चौगुले, दत्तात्रय बंडोपंत गुरव, भास्कर परब, सचिन पुजारे, शंकर सावंत, राजेंद्र परब, रुपेश लाड या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तालुका कृषी अधिकारी आर. पी. निर्मळ, मंडळ अधिकारी मधु देसाई, पूनम पालव व तलाठी यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. (प्रतिनिधी)
बदलत्या वातावरणाचा फटका - निर्मळ
याबाबत तालुका कृषी अधिकारी आर. पी. निर्मळ म्हणाले, सध्या पावसाची अनिश्चितता आहे. जून महिन्यात पाऊस कमी प्र्रमाणात लागल्यामुळे आणि मुबलक सूर्यप्रकाशामुळे उसाची झपाट्याने वाढ झाली. ही अकाली झालेली उसाची वाढ आणि हल्ली पडलेला जोरदार वादळी पाऊस यामुळे हा ऊस तग धरू शकला नाही आणि जमीनदोस्त झाला.
ऊस पिकात घट होणार
पावसामुळे जमीनदोस्त झालेल्या ऊस पिकाला आता पाळे फु टणार असून त्यामुळे कापणीच्या वेळच्या उसापासून मिळणाऱ्या उत्पन्नात २५ ते ३० टक्के एवढ्या प्रमाणात घट होणार असल्याचे मत कोल्हापूरच्या ऊस पीक तज्ज्ञांनी व्यक्त केल्याची माहिती आर. पी. निर्मळ यांनी दिली. पावसामुळे पडलेल्या उसाला पाळे फुटून त्याची वाढ खुंटणार आहे. त्यामुळे कापणीच्यावेळी या उसापासून मिळणाऱ्या उत्पादनात वाढ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडणार असून शेतकऱ्यांना मदतीची गरज असल्याचे त्यांचे मत आहे. अन्यथा येथील शेतकरी पूर्णपणे कोलमडणार आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे.

Web Title: Peel the sugarcane in Amber

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.