Open development file, do not want Rane: Nitesh Rane | विकासाच्या फाईल उघडा, राणेंच्या नको : नीतेश राणे
विकासाच्या फाईल उघडा, राणेंच्या नको : नीतेश राणे

ठळक मुद्देविकासाच्या फाईल उघडा, राणेंच्या नको : नीतेश राणे बंद प्रकल्पांना भेटी देऊन सत्य उजेडात आणणार

सावंतवाडी : माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी राणेंच्या फाईल उघडण्यापेक्षा सावंतवाडीच्या विकासाच्या फाईल उघडाव्यात. त्यातून सावंतवाडीवासीयांचा फायदा होईल, असे मत आमदार नीतेश राणे यांनी व्यक्त केले. सावंतवाडी शहरातील बंद प्रकल्पांना भेटी देऊन सत्य उजेडात आणणार असा इशाराही आमदार नीतेश राणे यांनी यावेळी दिला.

सावंतवाडी येथे आयोजित पत्रकार बोलत होते. यावेळी भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजू परब, प्रसाद आरविंदेकर, मिलिंद कुलकर्णी, सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी, दिलीप भालेकर, सत्यवान बांदेकर, चेतन आजगावकर, नगरसेविका दीपाली भालेकर, उत्कर्षा सासोलकर, बेला पिंटो, मोहिनी मडगावकर आदी उपस्थित होते.
आमदार राणे म्हणाले, आमदार केसरकर कितीही खालच्या पातळीवर जावून टीका करीत असले तरी सावंतवाडीची निवडणूक आम्ही केसरकर विरूध्द राणे, अशी होऊ देणार नाही.

आमच्या विरोधातील फायली उघडण्याची धमकी देणाऱ्या केसरकरांनी पहिल्यांदा विकासाच्या फायली उघडाव्यात. छोट्या राणेंची दखल घ्यायची गरज नाही, असे सांगणाऱ्या केसरकरांनी राणे हे घासून आले नाही तर ठासून आले आहे, असा टोला हाणत आता आपल्याला मंत्रीपद मिळणार नसल्याच्या नैराश्येपोटीच ते राणेंवर आरोप करत असल्याचे सांगितले.

कणकवलीची दहशत म्हणत असलेले केसरकर यांनी गेल्या पाच वर्षांत कणकवली, देवगड व वैभववाडी येथील निवडणुकीचा अभ्यास करावा. एक तरी राडा झाला का ते बघावे, असा सल्लाही आमदार राणे यांनी दिला.
सावंतवाडी नगराध्यक्षपदांची पोटनिवडणूक ही येथील जनतेच्या हिताची आहे. आम्ही दोन वर्षे मागत आहोत. उमेदवार स्थानिक आहे आणि विकास करण्याची धमक असलेला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून सावंतवाडीचा विकास फक्त कागदावर दिसत आहे. हा विकास करत असताना भविष्य काहीच नाही. येथील नागरिकांना सिनेमा बघायचा असेल तर दुसरीकडे जावे लागते. अनेक प्रकल्प बांधले ते वर्षानुवर्षे बंद आहेत. मग विकास कसला केला? असा सवाल आमदार राणे यांनी केला.

पुढील काही दिवसात यातील प्रत्येक बंद प्रकल्पावर जाऊन माहिती घेणार असून, हे बंद प्रकल्प आमच्या निवडणुकीचा मुद्दा राहतील. तसेच आमचा उमेदवार निवडून आल्यावर आम्ही सावंतवाडीवासीयांना काय देणार तेही यावेळी सांगू, असे आमदार राणे यांनी सांगितले.

सावंतवाडीतील मतदार सूज्ञ आहे. त्यामुळे खरा विकास कोण करेल याची त्यांना खात्री आहे. आतापर्यंत भावनेचे आणि दहशतवादांचे राजकारण केले. पण आता हे राजकारण जास्त दिवस चालणार नाही. येथील जनता आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराकडे बघून मतदान करेल, असेही यावेळी राणे यांनी सांगितले.

घासून नाही ठासून आलोय

छोटे राणे म्हणता, पण मी काय तुमच्यासारखा घासून आलो नाही. तर ठासून आलो आहे. आता आमच्यावर टीका करता ती फक्त मंत्रीपद मिळावे म्हणून. तुम्हाला, तुमच्या सहकारी आमदाराला मंत्रीपद मिळाले तर आपले काय होणार? या नैराश्येमध्ये केसरकर अडकले आहेत, अशी टीका आमदार नीतेश राणे यांनी केली आहे.

Web Title: Open development file, do not want Rane: Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.