दारूसह साडेतेरा लाखांचा मुद्देमाल जप्त, बांदा सटमटवाडी येथे एक ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 18:01 IST2019-08-29T17:58:32+5:302019-08-29T18:01:07+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ओरोस भरारी पथकाने मुंबई-गोवा महामार्गावर बांदा- सटमटवाडी येथे मंगळवारी मध्यरात्री गोवा बनावटीच्या अवैध दारू वाहतुकीवर केलेल्या कारवाईत ३ लाख ४९ हजार २०० रुपयांच्या अवैध दारूसह एकूण १३ लाख ४९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर बिगरपरवाना गोवा बनावटीच्या दारुची अवैधरित्या वाहतूक केल्याप्रकरणी चंद्रकांत संभाजी ओहोळ (४०, रा. पिंपरी, अहमदनगर) याला ताब्यात घेतले.

अवैध दारू वाहतुकीदरम्यान जप्त करण्यात आलेला दारूसाठा व कार दिसत आहे.
बांदा : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या ओरोस भरारी पथकाने मुंबई-गोवा महामार्गावर बांदा- सटमटवाडी येथे मंगळवारी मध्यरात्री गोवा बनावटीच्या अवैध दारू वाहतुकीवर केलेल्या कारवाईत ३ लाख ४९ हजार २०० रुपयांच्या अवैध दारूसह एकूण १३ लाख ४९ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर बिगरपरवाना गोवा बनावटीच्या दारुची अवैधरित्या वाहतूक केल्याप्रकरणी चंद्रकांत संभाजी ओहोळ (४०, रा. पिंपरी, अहमदनगर) याला ताब्यात घेतले.
मुंबई-गोवा महामार्गावरून गोवा बनावटीच्या अवैध दारुची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार या विभागाचे कोल्हापूर उपायुक्त व सिंधुदुर्ग जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली ओरोस येथील भरारी पथकाचे प्रभारी निरीक्षक सत्यवान भगत, दुय्यम निरीक्षक दिवाकर वायदंडे, आर. डी. ठाकूर, दीपक वायदंडे, यू. एस. थोरात, आर. एस. शिंदे यांच्या टिमने मंगळवारी रात्रीपासून बांदा-सटमटवाडी येथे महामार्गावर सापळा रचला होता.
या पथकाने बांदा-सटमटवाडी धाब्यासमोर (एम. एच. १६, बी. झेड. ७०५३) या संशयित कारला थांबण्याचा इशारा करीत ही गाडी तपासली. त्यावेळी या कारमध्ये एकूण ३ लाख ४९ हजार २०० रुपये किमतीचे अवैध गोवा बनावटी दारुचे ३० खोके आढळून आले.
ही गोवा बनावटीची अवैध दारू आणि दारू वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली १० लाखांची कार असा एकूण १३ लाख ४९ हजार २०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गोवा बनावटीची विनापरवाना अवैध दारू वाहतूक केल्याप्रकरणी कारचालक ओहोळ याला ताब्यात घेण्यात आले आहे.