चिखलफेक प्रकरणात नितेश राणेंना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2019 17:42 IST2019-07-05T17:14:15+5:302019-07-05T17:42:26+5:30
या प्रकारानंतर नितेश राणेंवर गुन्हा दाखल झाला असून, त्यांना अटकही करण्यात आली होती.

चिखलफेक प्रकरणात नितेश राणेंना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी
कणकवली- मुंबई-गोवा महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांना जबाबदार धरत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना नितेश राणेंनी चिखलाच्या पाण्याने आंघोळ घातली. या प्रकारानंतर नितेश राणेंवर गुन्हा दाखल झाला असून, त्यांना अटकही करण्यात आली होती. दुपारी 3 वाजता न्यायालयात हजर केले असता, दोन्ही बाजूंनी या प्रकरणावर वकिलांनी युक्तिवाद केला, अखेर न्यायालयानं नितेश राणेंना 9 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर कणकवली बाजारपेठ बंद करण्यात आली आहे.
तत्पूर्वी नितेश राणेंना पोलीस ठाण्यात हजर केले असता, त्यांनी पोलिसांशी बोलताना गोंधळ घातला होता. तुम्हाला काय करायचंय ते करा, तुम्ही मला अटक केली तर कणकवलीकर मरतील, असे म्हणत राणेंनी पोलिसांना अटक न करण्याचे आवाहन केले. नितेश राणे आणि त्यांच्या 40 ते 50 समर्थकांवर कलम 353, 342, 332, 324, 323, 120(A), 147, 143, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला गेला आहे. नितेश राणेंनीही पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. मात्र, पोलीस ठाण्यात गेल्यानंतर राणेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. तसेच तुम्हाला जे करायचंय ते करा, पण मला अटक केल्यास ते जिंकतील, असे म्हणत शिवसेना नेत्यांकडे इशारा केला होता.
आमदार नितेश राणे यांच्यासह नगराध्यक्ष समीर नलावडे आणि स्वाभिमान कार्यकर्त्यांनी शेडेकर यांना गडनदी पुलाला बांधून ठेवले होते. एवढेच नव्हे तर सर्वसामान्य जनता रोज चिखल मारा सहन करते आहे. तुम्ही पण त्याचा अनुभव घ्या, असे म्हणत शेडेकर यांच्या डोक्यावर चिखलाच्या बादल्या कार्यकर्त्यानी ओतल्या. कणकवलीनगरी तुंबवायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असे विचारत आमदार नितेश राणे यांच्यासह स्वाभिमान कार्यकर्त्यांनी उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना गडनदी पूल ते जानवली नदीपुलापर्यंत पायी चालत नेऊन चिखल आणि खड्ड्यांची वस्तुस्थिती दाखवली. यावेळी येत्या दोन दिवसांत सर्व्हिस मार्ग सुरक्षित करण्याचे आश्वासन प्रकाश शेडेकर यांनी दिले होते.