Sindhudurg: वैभववाडीच्या पर्यटनाला ‘अच्छे दिन’ कधी येणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 17:27 IST2025-05-03T17:26:57+5:302025-05-03T17:27:37+5:30

प्रकाश काळे वैभववाडी : वैभववाडी तालुक्याच्या विकासाबाबत प्रत्येकाच्या संकल्पना वेगवेगळ्या असू शकतात. मात्र, पर्यटनस्थळांच्या विकासातून पायाभूत सुविधा उपलब्ध करून ...

Need for solutions for tourism in Vaibhavwadi | Sindhudurg: वैभववाडीच्या पर्यटनाला ‘अच्छे दिन’ कधी येणार?

Sindhudurg: वैभववाडीच्या पर्यटनाला ‘अच्छे दिन’ कधी येणार?

प्रकाश काळे

वैभववाडी : वैभववाडी तालुक्याच्या विकासाबाबत प्रत्येकाच्या संकल्पना वेगवेगळ्या असू शकतात. मात्र, पर्यटनस्थळांच्या विकासातून पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या तर निश्चितपणे त्या-त्या भागाचा कायापालट होऊ शकेल. परंतु, हे मनावर घेऊन त्याचा पाठपुरावा आणि पूर्तता करण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. मागील २५ वर्षांत तालुक्यातील पर्यटनस्थळांच्या विकासाच्या अनेक घोषणा झाल्या. मात्र, प्रत्यक्षात अंमलबजावणी किती टक्के झाली? हे सर्वश्रुत आहे. त्यामुळेच या पर्यटनस्थळांना ‘अच्छे दिन’ येणार तरी कधी? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.

साधारणपणे बारमाही प्रवाही असलेला नापणे धबधबा, त्याचा प्रमुख स्रोत असलेला नाधवडेतील अद्भूत नैसर्गिक ‘उमाळा’, ऐनारीची ऐतिहासिक गुहा हीच पर्यटनस्थळे प्रामुख्याने सर्वांच्या चर्चेत आहेत. परंतु, नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असलेला कोकिसरेतील ‘सालवा’, जैवविविधता संपन्न असलेले शिराळे तसेच खांबाळे, सडुरे, करुळ, वाभवेसह अन्य काही   पावसाळी धबधबे,   छोटी-मोठी धरणे, तलाव आणि मंदिर परिसर विकासाच्या माध्यमातून ‘पर्यटन वृद्धी’ला चालना मिळू शकेल. मात्र, त्याकडे डोळसपणे पाहिल्यास त्या-त्या भागातील रोजगाराच्या समस्येवर काहीअंशी उपाय निघणारा आहे.

नापणे धबधब्यावर जाण्यासाठी पूर्वी नाधवडेतून एकच मार्ग होता. खासदार नारायण राणे राज्याचे महसूल मंत्री असताना त्यांनी नापणे धनगरवाडा (रेल्वे स्टेशन) ते धबधब्यापर्यंत नवीन रस्ता आणि नदीवर पूल मंजूर करून नापणे धबधब्यावर बारमाही वाहतूक सुरू केली. तसेच पालकमंत्री म्हणून त्यांनी ऐनारी गाव ‘दत्तक’ जाहीर  करून गुहेकडे जाणारा रस्ता करून घेतला. त्यानंतर गेल्या १२ वर्षांत पुढे काहीही झाले नाही.

‘सालवा’, ‘शिराळे’वर लक्ष केंद्रित करण्याची गरज

कोकिसरे, खांबाळे, आचिर्णे, गडमठ, कासार्डे व नाधवडे या सहा गावांच्या मध्यभागी असलेला शेकडो हेक्टर पठाराचा ‘सालवा’ डोंगर नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध आहे. विविध वन्यजीव, दुर्मिळ वनस्पती, पक्ष्यांच्या अनेक प्रजाती तेथे पाहायला मिळतात. त्यामुळे कोकणात येणाऱ्या पर्यटकांना ‘सालव्या’चे कुतुहल आहे. परंतु, हा संपूर्ण परिसर सरकारने गायरान म्हणून संरक्षित केलेला असल्यामुळे तिथे जाण्यासाठी नीट मार्गही नाही. त्यामुळे हौशी पर्यटकांना भावनेला मुरड घालून मार्गस्थ व्हावे लागत आहे.

त्याचप्रमाणे दाजिपूर-राधानगरीच्या अभयारण्याला लागून असलेल्या व शेकडो वर्षांपासून चालणाऱ्या गावपळणीचा वारसा जपणाऱ्या शिराळे गावातील जैवविविधता, वनौषधी, निसर्गसौंदर्य पर्यटनाला चालना देण्यास उपयुक्त आहेत. शिराळे हा चहूबाजूंनी गर्द वनराई आणि डोंगरांनी वेढलेला भाग असल्याने येथे पर्यटन विकासाला खूप मोठी संधी आहेच! त्याचबरोबर शिराळेच्या पर्यटनाला चालना दिली तर  गावांचा कायापालट व्हायला वेळ लागणार नाही.

गावांतील धबधब्यांसह धरणे, तलावांवर सुविधांची गरज

तालुक्यात खांबाळे, कोकिसरे-बांधवाडी, सडुरे, करुळ, वाभवे-वैभववाडी यासह अनेक गावांमध्ये पावसाळी धबधबे आहेत. मात्र, यापैकी बऱ्याच ठिकाणी जाण्यास मार्ग नाहीत. त्यामुळे पर्यटकांना त्याची माहिती नाही किंबहुना रस्त्यांअभावी तिकडे जाणे टाळले जाते. हे स्थानिकांच्या रोजगाराला मारक आहे.

त्याचबरोबर नाधवडे, कोकिसरे-खांबलवाडी, करुन डोणा, जामदारवाडी, कुंभवडे, तिथवली, नानिवडे या धरणांच्या परिसरात आवश्यक सोयीसुविधा निर्माण करून बोटिंगसारखे प्रकल्प राबवायला काहीच अडचण नाही.त्यामुळे स्थानिक पातळीवर प्रवासी वाहतूक, हॉटेल व्यवसायाबरोबरच ग्रामीण पर्यटन बहरू शकते. अन्य राज्यांप्रमाणे धार्मिक पर्यटनाला वाव दिला पाहिजे. मात्र, त्यादृष्टीने प्रयत्न किंवा तळमळ दिसत नाही. त्यामुळेच देशातील पहिल्या पर्यटन जिल्ह्यातील वैभववाडी तालुका पर्यटन विकासापासून वंचित राहिला आहे.

नापणे धबधब्यावर आश्वासनांचा पाऊस

राज्यात २०१४ मध्ये युतीचे सरकार आल्यावर तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सार्वजनिक बांधकाम आणि पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांची धबधब्यावर बैठक घेऊन पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रेलिंग, झुलता पूल, ‘व्ह्यू पॉइंट’ गार्डनसह परिसर सुशोभीकरणाचा बांधकाम व पर्यटन विभागाला आराखडा तयार करण्यास सांगून धबधब्याच्या परिसरात ‘हेल्थ स्पा’ सुरू करण्याची घोषणा केली होती.

त्यामुळे स्थानिक पातळीवर प्रवासी वाहतूक, हॉटेल व्यवसायाबरोबरच ग्रामीण पर्यटन बहरू शकते. अन्य राज्यांप्रमाणे धार्मिक पर्यटनाला वाव दिला पाहिजे. मात्र, त्यादृष्टीने प्रयत्न किंवा तळमळ दिसत नाही. त्यामुळेच देशातील पहिल्या पर्यटन जिल्ह्यातील वैभववाडी तालुका पर्यटन विकासापासून वंचित राहिला आहे.

Web Title: Need for solutions for tourism in Vaibhavwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.