राष्ट्रवादीच्या बंडखोरांची तटकरेंकडे कैफियत
By Admin | Updated: July 3, 2014 00:26 IST2014-07-03T00:22:28+5:302014-07-03T00:26:18+5:30
मुंबईत आज तोडगा : सिंधुदुर्गातील २५ पदाधिकाऱ्यांशी चर्चा

राष्ट्रवादीच्या बंडखोरांची तटकरेंकडे कैफियत
सावंतवाडी : काँग्रेसचा उमेदवार लोकसभा निवडणूक लढवत असताना त्यांच्याच पक्षाचे आमदार विजय सावंत त्यांना मतदान करू नका, अशी उघड भूमिका घेत होते, तर आम्ही मित्रपक्षाच्या अन्यायग्रस्त पदाधिकाऱ्यांनी विरोध केला तर काय बिघडले? अशी भूमिका आज, बुधवारी राष्ट्रवादीतील बंडखोर पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी नूतन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याजवळ मांडली. त्यावेळी प्रदेशाध्यक्षांनी उद्या, गुरुवारी चर्चा करून तोडगा काढू असे आश्वासन दिले.
लोकसभा निवडणुकीत काँॅग्रेसचे उमेदवार नीलेश राणे यांच्या प्रचारात असहकार दाखवल्याने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाळा भिसे यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांना आज नूतन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी चर्चेसाठी बोलावले होते. यावेळी जिल्ह्यातून २५ प्रमुख पदाधिकारी गेले होते. यावेळी माजी आमदार पुष्पसेन सावंत, प्रकाश परब, पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष, आदींनी या बैठकीत प्रदेशाध्यक्षांसमोर बाजू मांडली.
बाळा भिसे यांनी या बंडखोरांची बाजू मांडताना सांगितले की, आमची लढाई दहशतवादाविरोधात होती. प्रत्येकवेळा पक्षाला डावलले जात होते. सिंधुदुर्गमध्ये राष्ट्रवादी आघाडीतील पक्ष असा वाटतच नव्हता. पालकमंत्री नारायण राणे यांनी अनेकवेळा डावलले. या रागातून हा विरोध केला.
राणेंना आमचा विरोध नव्हता, तर जनतेचा विरोध होता आणि तो मतदारांनी व्यक्त केला, असेही भिसे म्हणाले. या बैठकीत मंगळवारी सिंधुदुर्गमध्ये येऊन मंत्री आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावरही पक्षाच्या बैठकीत चर्चा झाली. उद्या मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासोबत बैठक होईल.(प्रतिनिधी)