Narayan Rane of the government, who did not propose Savarkar's greetings, was aggressive: protests | सावरकरांच्या अभिवादनाचा प्रस्ताव न घेणाऱ्या सरकारचा नारायण राणेकडून निषेध

सावरकरांच्या अभिवादनाचा प्रस्ताव न घेणाऱ्या सरकारचा नारायण राणेकडून निषेध

ठळक मुद्देसावरकरांच्या अभिवादनाचा प्रस्ताव न घेणाऱ्या सरकारचा नारायण राणेकडून निषेधमुख्यमंत्र्यांना थंडी वाजत होती की लाज?

कुडाळ : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचा प्रस्ताव विधानसभेत घेतला गेला नाही. उलट सभागृहात गदारोळ करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थंडी लागत होती की, त्यांना लाज वाटत होती? असा खडा सवाल माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी उपस्थित केला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व त्याग करणाऱ्या सावरकरांच्या अभिवादनाचा प्रस्ताव न घेणाऱ्या सरकारचा त्यांनी यावेळी जाहीर निषेध केला.

लाईफ टाईम हॉस्पिटल पडवे येथे राज्याचे माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, कुडाळ तालुकाध्यक्ष विनायक राणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, डॉ. मिलिंद कुलकर्णी तसेच भाजपाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार राणे म्हणाले, सावरकर यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला. दोन वेळा जन्मठेपेची शिक्षाही भोगली. अनेक वर्षे तुरुंगवासही भोगला. अशा राष्ट्रपुरुषाच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादनाचा प्रस्ताव विधानसभेत आमच्या भाजपाच्या आमदारांनी मांडला. मात्र, नियमात बसत नसल्याचे कारण देत हा प्रस्ताव विधानसभेत येऊ दिला नाही. अशावेळी मुख्यमंत्री ठाकरे काय करीत होते? त्यांना थंडी वाजत होती की, लाज वाटत होती? सभागृहात सावरकरांच्या योगदानाएवढे कोणाचे योगदान आहे का? असे सवाल राणेंनी उपस्थित केले. खरेतर सभागृहात अनेक नियमात नसणाऱ्या अनेक चांगल्या गोष्टींवर यापूर्वी अनेकदा चर्चा करण्यात आली. सावरकर यांच्याही अभिवादनाचा ठराव घेतला पाहिजे होता, असे मत त्यांनी व्यक्त केले.

मात्र शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्हीही पक्ष एकत्र आले ते राज्याच्या भल्यासाठी नाहीतर केवळ सत्तेसाठी व पैसे लाटण्यासाठी आले आहेत. यांना राष्ट्रपुरुषांबद्दल कोणतीही आस्था नाही, अशी टीकाही त्यांनी सरकारवर केली.

केवळ मासे कसे खायचे याची माहिती असणाऱ्या मत्स्यमंत्र्यांना मच्छिमारांचे प्रश्न, मासेमारी याबाबतचे प्रश्न माहीत नाहीत आणि ते मत्स्य दुष्काळ नाही असे जाहीर करतात, हे अत्यंत चुकीचे असून येथील मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

मागील साडेसोळा कोटी रुपयांची नुकसान भरपाई अजूनही हे सरकार मच्छिमारांना देऊ शकले नाहीत. मच्छिमारांचे प्रश्न या सरकारला माहीत नाहीत. मच्छिमारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे सरकारने केले आहे. आता मत्स्यदुष्काळ जाहीर करत नाही तोपर्यंत विरोधीपक्ष शांत बसणार नाही, असा इशाराही राणेंनी दिला.

उद्धव ठाकरे यांची कर्जमाफीची घोषणा फसवी

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असे ठणकावून सांगणारे मुख्यमंत्री ठाकरे कर्जमाफीची फक्त घोषणा करून शांत बसले आहेत. तर शेतकरी कर्जमाफी कधी मिळणार याची पाहताहेत वाट पाहत आहेत. पण उद्धव ठाकरे यांची कर्जमाफीची घोषणा फसवी आहे.

राज्याची तिजोरी रिकामी असताना पर्यटन मंत्री निधी देणार असल्याची घोषणा कशाच्या आधारे करतात? घोषणा करण्यापूर्वी त्यांनी अर्थमंत्र्यांना तरी विचारले का? असाही सवाल राणेंनी उपस्थित करीत हे सरकार व ठाकरे काहीच करू शकत नाहीत, असा टोलाही लगावला.

आता विमानतळ १ मे रोजी सुरू होतो का ते पाहणार आहे. जिल्ह्यातील प्रकल्प, विकासकामे बंदावस्थेत असून गेल्या पाच वर्षात खासदार विनायक राऊत यांनी एकही विकासकाम केले नाही. उलट ते ठेकेदारांजवळ पैसे मागत आहेत. म्हणूनच ठेकेदार पळवून जात असून राऊत ज्या ठेकेदारांजवळ पैसे मागताहेत त्याची यादी लवकरच जाहीर करणार असल्याचा इशारा राणेंनी राऊत यांना दिला.

Web Title:  Narayan Rane of the government, who did not propose Savarkar's greetings, was aggressive: protests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.