मुंबई–विजयदुर्ग रो-रो सेवेची चाचणी यशस्वी; ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषी स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 16:04 IST2025-09-03T16:02:20+5:302025-09-03T16:04:22+5:30
चाकरमान्यांसाठी ठरणार वरदान

मुंबई–विजयदुर्ग रो-रो सेवेची चाचणी यशस्वी; ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषी स्वागत
देवगड : मुंबई - विजयदुर्ग रो-रो सेवेच्या प्रतीक्षेत असलेल्या चाकरमान्यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली रो-रो सेवा बोट आज (मंगळवार) सायंकाळी सहा वाजता विजयदुर्ग बंदरात दाखल झाली. बोटीचे आगमन होताच ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या रोषणाईत आणि जल्लोषात तिचे भव्य स्वागत करण्यात आले.
यावेळी विजयदुर्ग ग्रामस्थांसह मुंबईतील चाकरमानी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ते या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणारी ही सेवा मुंबई-सिंधुदुर्ग प्रवासात क्रांती घडवून आणणार आहे.
पहिली चाचणी यशस्वी : पालकमंत्री नितेश राणे
सिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि बंदर विकास मंत्री आमदार नितेश राणे यांनी सांगितले, “आज विजयदुर्ग बंदरात बोटीची पहिली यशस्वी चाचणी पूर्ण झाली आहे. हवामान अनुकूल राहिल्यास आणि सर्व यंत्रणांची पडताळणी समाधानकारक झाल्यास ही सेवा कायमस्वरूपी सुरू करण्यात येईल.” “परतीच्या प्रवासात या बोटीमार्गे चाकरमान्यांना थेट मुंबई गाठण्याचा मार्ग मोकळा होईल.”
चाकरमान्यांसाठी ठरणार वरदान
मुंबई-विजयदुर्ग दरम्यानची ही रो-रो सेवा सुरू झाल्यास प्रवाशांचा प्रवासाचा वेळ आणि खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. स्थानिक विकास, पर्यटन आणि चाकरमान्यांच्या सोयीसाठी ही सेवा वरदान ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.