कणकवली (जि. सिंधुदुर्ग) : मुंबई-विजयदुर्ग रो-पॅक्स जलवाहतूक सेवेचा रविवारी मोठ्या उत्साहात प्रारंभ सोहळा झाला. मत्स्य व बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पूजा करून ‘भाऊचा धक्का’ (मुंबई) येथून या सेवेची पहिली फेरी कोकणच्या दिशेने रवाना झाली. पहिल्या फेरीला मुंबईकर चाकरमानी व पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.ही रो-पॅक्स सेवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पायाभूत सुविधा आणि सागरी विकासाला चालना देणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक मानली जाते. राज्यातील सागरी वाहतूक अधिक सक्षम आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. कोकण आणि मुंबई यांना अधिक प्रभावीपणे जोडण्यासाठी जलवाहतूक हा सर्वोत्तम पर्याय आहे. या सेवेच्या माध्यमातून प्रवाशांचा वेळ, खर्च आणि श्रम वाचतील, असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.
४० चारचाकी वाहने, २५ दुचाकी वाहने वाहून नेण्याची क्षमताही रो-पॅक्स बोट सुमारे ६२५ प्रवासी क्षमतेची असून त्यामध्ये एकाच वेळी ४० चारचाकी वाहने आणि २५ दुचाकी वाहने वाहून नेण्याची क्षमता आहे. प्रवाशांसाठी आरामदायी आसन व्यवस्था, सुरक्षितता उपकरणे, आधुनिक नेव्हिगेशन प्रणाली आणि सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
वेळेची मोठी बचत होणारमुंबई ते विजयदुर्ग हा प्रवास अवघ्या ६ ते ७ तासांत पूर्ण होणार असल्याने वेळेची मोठी बचत होणार आहे, तसेच वाहनांसह प्रवासाची सुविधा उपलब्ध असल्याने कुटुंबासोबत किंवा व्यावसायिक कारणांसाठी जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.