..यामुळे मुंबई मनपा निवडणूक अडकली - नितेश राणे
By सुधीर राणे | Updated: October 9, 2023 17:36 IST2023-10-09T17:35:28+5:302023-10-09T17:36:33+5:30
ग्रामसेवक बनायचीही पात्रता नसलेले संजय राऊत मुख्यमंत्री पदाचे स्वप्न बघत होते

..यामुळे मुंबई मनपा निवडणूक अडकली - नितेश राणे
कणकवली: मुंबई महानगरपालिका निवडणूक ठाकरे सेनेमुळे लांबत आहे. त्यांनी न्यायालयातील आपल्या याचिका मागे घ्याव्यात. मग निवडणूक आयोग निवडणूक घेईल. ठाकरे सेनेच्या न्यायलयातील याचिकांमुळेच मुंबई महानगरपालिका निवडणुक अडकली आहे. अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली.
कणकवली येथे प्रसार माध्यमांशी त्यांनी सोमवारी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, ग्रामसेवक बनायचीही पात्रता नसलेले संजय राऊत २०१९ ला मुख्यमंत्री पदाचे स्वप्न बघत होते. शरद पवार आपलेच नाव पुढे चालवणार म्हणून ते आमदारांना फोन करायला लागले होते. पण २ ते ३ पेक्षा जास्त आमदार त्यांच्या बैठकीला जमलेच नाहीत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी राऊत यांची पात्रता ओळखली म्हणूनच त्यांचे भाऊ सुनील राऊत यांना साधे राज्यमंत्रीही केले नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलण्याआधी संजय राऊत यांनी स्वतःची पात्रता ओळखावी.
'ते' सांगण्याइतकं तुम्ही मोठे नाही
शिंदे गटातील शिवसेना आमदारानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना किती त्रास होत आहे हे प्रथम पहावे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी काय काम करावे? कुठे करावे ? हे सांगण्या इतके तुम्ही मोठे नाहीत.हे लक्षात घ्यावे. मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री या तिघांना काम करू द्यावे. आपल्या बोलण्यामुळे राऊत, ठाकरे यांना फायदा होईल असे वागू नये. असे आवाहन मित्र पक्षाच्या आमदारांना राणे यांनी केले.
..त्यानंतर दुसऱ्यांवर टीका करा
ठाकरे सेनेला स्वतःचे चिन्ह नाही, पक्ष नाही. मग ते काय करणार? त्यांना इंडिया आघाडी शिवाय दुसरा पर्याय नाही. बाळासाहेब ठाकरे तुमचे सुद्धा विठ्ठल होते ना, मग त्यांचे घर तुम्ही का फोडले? शरद पवार तुमचे होते मग त्यांच्या घरात फूट का पाडली? याचे उत्तर संजय राऊत यांनी द्यावे. त्यानंतरच दुसऱ्यांवर टीका करावी राणे म्हणाले.