दीपक केसरकरांची पोपटपंची फार दिवस टिकणार नाही, विनायक राऊतांचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 12:31 IST2022-08-30T12:30:59+5:302022-08-30T12:31:31+5:30
शिंदे गटाकडून शिवसेना ताब्यात घेण्याचा प्रयत्न

दीपक केसरकरांची पोपटपंची फार दिवस टिकणार नाही, विनायक राऊतांचा टोला
सावंतवाडी : मंत्री दीपक केसरकर यांची पोपटपंची आता जास्त दिवस टिकणार नाही. जनतेने सर्व काही ओळखले असून त्यांची वक्तव्ये गांभीर्याने घेणारी नसतात अशी जोरदार टीका खासदार विनायक राऊत यांनी केली. यावेळी शिंदे गटाकडून शिवसेना ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ही त्यांनी केला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
कोलगाव येथील टॉवर च्या उद्घाटनासाठी काल, सोमवारी राऊत आले होते. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा, बाळा गावडे, योगेश नाईक, अपर्णा कोठावळे, गुणाजी गावडे, मेघश्याम काजरेकर आदींसह शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.
शिंदे गट शिवसेनेच्या प्रत्येक गोष्टीवर आपला अधिकार सांगत आहेत. मात्र मुंबईत होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर कोणीही कितीही दावा केला. तरी तो पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालीच होईल काहीनी कितीही आदळआपट करू देत आम्हाला काही देणे घेणे नाही. ते सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर वर भाष्य करत असतील तर त्याना काय बोलणार ते आता कुणाला मानायलाच तयार नाहीत असा आरोप ही राऊत यांनी शिंदे गटावर केला.
संजय राऊत यांना ईडीने फसविले
शिंदे गट केवळ आमदार आणि खासदारांना फोडून गप्प बसला नाही. तर त्यांनी पूर्ण शिवसेना गुंडाळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेनेच्या अनेक गोष्टीवर त्यांनी आपला दावा केला आहे. यात मुंबईत होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी सुद्धा त्यांनी परवानगी मागितली आहे. मात्र ठाकरे यांच्या माध्यमातून पहिली परवानगी आम्ही मागितली आहे. खासदार संजय राऊत यांना इडीने फसवले आहे. मात्र पूर्ण शिवसेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे राऊत म्हणाले.