मालवणमध्ये राजकीय भूकंप!, नगराध्यक्ष महेश कांदळगावकरांची शिवसेनेला सोडचिठ्ठी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 15:54 IST2022-04-21T13:49:51+5:302022-04-21T15:54:46+5:30
...म्हणून पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय

मालवणमध्ये राजकीय भूकंप!, नगराध्यक्ष महेश कांदळगावकरांची शिवसेनेला सोडचिठ्ठी
मालवण : मालवण नगरपालिकेचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेना पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय बुधवारी पत्रकार परिषदेत जाहीर केला. कांदळगावकर यांनी आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्नी स्मृती कांदळगावकर उपस्थित होत्या.
ते म्हणाले, कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मालवण पालिकेत प्रशासकीय अनुभवावर गेली पाच वर्षे नगराध्यक्ष या प्रतिष्ठेच्या खुर्चीवर नागरिकांनी आपल्याला बसवल्याबद्दल आपण जनतेचे आणि शिवसेनेने आपल्याला ही संधी दिली, त्याबद्दल त्यांचे आभार मानत आहे.
कुठलीही राजकीय स्पर्धा, शह- काटशह मनात न ठेवता आपल्याला दिलेल्या पाच वर्षांच्या कालावधीत शहराचा विकास कसा करता येईल, यासाठी मी प्रयत्न केले. हे करत असताना अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. पण, हा राजकारणाचा एक भाग म्हणून याला उत्तर प्रत्युत्तरात वेळ न घालवता तसेच प्रसिद्धीच्या मागे वेळ फुकट न घालवता जास्तीतजास्त शहराच्या विकास कामांकडे लक्ष दिले.
विरोधकांच्या प्रभागातही लाखो रुपयांची कामे करण्यात आली आणि या सर्वांचा परिणाम म्हणून विरोधी नगरसेवकांनीही शिवसेना पक्षात प्रवेश केला. त्यामुळे पक्षाची ताकद वाढली. मालवणच्या पाणीयोजनेला बरीच वर्षे झाल्याने त्या ठिकाणी सुमारे ४५ कोटी. रुपयांची नवीन योजना प्रस्तावित करण्यात आली. लवकरच त्याला अंतिम मंजुरी मिळेल.
...म्हणून पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय
पाच वर्षे मालवणचा विकास हा एक अजेंडा घेऊन काम करत असताना माझा कुटुंबाकडे, आरोग्याकडे आणि व्यवसायाकडे दुर्लक्ष झाला. त्यामुळे यापुढे पक्षाच्या कामाला पुरेसा वेळ देणे शक्य होईल, असे वाटत नसल्यानेच या कारणास्तव आज पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचे कांदळगावकर यांनी स्पष्ट केले.