सेना-भाजपा युतीनंतरच गणिते होणार स्पष्ट, स्वाभिमानमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2019 08:23 AM2019-07-26T08:23:54+5:302019-07-26T08:24:38+5:30

शिवसेना-भाजप युती कायम राहणार की 2014च्या विधानसभा निवडणुकीप्रमाणे ते स्वतंत्र लढणार यावर जिल्ह्यातील राजकारणाची बहुतांशी गणिते ठरणार आहेत.

Mathematics will be clear only after Sena-BJP alliance | सेना-भाजपा युतीनंतरच गणिते होणार स्पष्ट, स्वाभिमानमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच

सेना-भाजपा युतीनंतरच गणिते होणार स्पष्ट, स्वाभिमानमध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच

Next

- महेश सरनाईक 

सिंधुदुर्ग : विधानसभा निवडणुकीचे वारे जिल्ह्यात वाहू लागले असून, लोकसभा निवडणुकीप्रमाणे शिवसेना-भाजप युती कायम राहणार की 2014च्या विधानसभा निवडणुकीप्रमाणे ते स्वतंत्र लढणार यावर जिल्ह्यातील राजकारणाची बहुतांशी गणिते ठरणार आहेत. लोकसभा निवडणुकीत युती केल्यामुळे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांचा दुस-यांदा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे. 

विधानसभा निवडणुकीत नारायण राणेंचा स्वाभिमान पक्ष, शिवसेना आणि भाजप या प्रमुख तीन पक्षांमध्ये रंगतदार लढाई पहायला मिळणार आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे हे तीन पक्ष जरी सर्व जागांवर उमेदवार देऊ शकले नाहीत तरी त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. पक्ष स्थापनेनंतरच्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत स्वाभिमान पक्षाला जिल्ह्यात मिळालेली मते पाहता युती न झाल्यास सेना-भाजपला फटका बसून दोघांची लढाई अन् तिस-याचा फायदा अशी स्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहेत. 

विधानसभा निवडणूक ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. त्यादृष्टीने सर्वच पक्ष आता कामाला लागले आहेत. जिल्ह्याचा विचार करता कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी असे तीन उपविभाग असून देवगड, वैभववाडी, कणकवली, मालवण, कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी आणि दोडामार्ग असे आठ तालुके आहेत. जिल्ह्यात एकूण ७५२ महसुली गावे असून, ४३३ ग्रामपंचायती आहेत. कणकवली (२६८), कुडाळ (२६९) आणि सावंतवाडी (२७०) असे तीन विधानसभा मतदारसंघ आहेत. कणकवली मतदारसंघात देवगड, वैभववाडी व कणकवली या तीन तालुक्यांचा, कुडाळ विधानसभा मतदारसंघात कुडाळ आणि मालवण तर सावंतवाडी मतदारसंघात सावंतवाडी, वेंगुर्ले आणि दोडामार्ग या तीन तालुक्यांचा समावेश आहे.

गत निवडणुकीत म्हणजे 2014 साली कणकवली मतदारसंघातून काँग्रेसचे नीतेश राणे, कुडाळमध्ये शिवसेनेचे वैभव नाईक आणि सावंतवाडीमध्ये शिवसेनेचे दीपक केसरकर असे तीन आमदार निवडून आले. ही निवडणूक राजकीयदृष्ट्या सिंधुदुर्गचे राजकारण पलटविणारी होती. कारण या निवडणुकीत सलग सहा वेळा निवडून आलेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा पहिल्यांदाच पराभव झाला होता. शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी जायंट किलरची भूमिका बजावताना राणेंचा दहा हजारांच्या मताधिक्याने पराभव केला होता. 

एकीकडे राणेंचा पराभव झाला असताना कणकवली मतदार संघात मात्र २० हजारांपेक्षा जास्त मताधिक्याने नीतेश राणे हे काँग्रेसकडून पहिल्यांदाच आमदार झाले होते. तर सावंतवाडी मतदार संघात २००९ प्रमाणे २०१४ च्या निवडणुकीत मोठा विजय मिळवून दीपक केसरकर हे दुसºयांदा आमदार झाले होते. केसरकर हे पहिल्यांदा राष्ट्रवादीच्या तर दुसºयांदा शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झाले. त्यात केसरकर यांची आमदारकीची दुसरी वेळ असल्याने आणि नारायण राणेंना कडाडून विरोध करीत केसरकर यांनी खासदार विनायक राऊत यांच्या विजयात मोलाची कामगिरी बजावल्याने मातोश्रीकडून त्यांना मंत्रिपदाची भेट मिळाली आणि दीपक केसरकर सिंधुदुर्गचे पालकमंत्रीही झाले. 

आता लोकसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती होती. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातून विनायक राऊत दुसºयांदा मोठ्या मताधिक्याने निवडून आले. या निवडणुकीत राऊत यांना स्वाभिमानकडून माजी खासदार निलेश राणे यांनी टक्कर दिली. राणेंनी दीड वर्षापूर्वी स्थापन केलेल्या स्वाभिमान पक्षाला पूर्ण मतदार संघात २ लाख ७९ हजार मते मिळाली. तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे हे तीन पक्ष लोकसभा निवडणुकीत मोठा करिश्मा दाखवू शकले नाहीत.

आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्ह्यातील बहुतांशी राजकीय सत्तास्थाने ताब्यात असलेला स्वाभिमान आणि शिवसेना या दोन प्रमुख पक्षांमध्ये ‘काँटे की टक्कर’ होणार आहे. मात्र, देशासह राज्यात प्रथम क्रमांकावर असलेल्या भाजपानेही जोरदार कंबर कसली असून सिंधुदुर्गात तीन पैकी एका जागी तरी भाजपाचा आमदार निवडून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. सर्वांच्या नजरा युती होणार की नाही? याकडे लागल्या असून युती झाली तर सेना-भाजपाला निवडणूक सोपी जाणार असून युती न झाल्यास दोघांच्या भांडणात स्वाभिमानचा फायदा होण्याची चिन्हे आहेत. 

एकंदरीत यावेळची निवडणूक ही अतिशच चुरशीची आणि आगळी-वेगळी ठरणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्व राज्याचे लक्ष सिंधुुदुर्ग जिल्ह्याकडे लागणार आहे.

खासदार असतानाही नारायण राणे रिंगणात उतरणार काय ?

माजी मुख्यमंत्री आणि स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे हे स्वाभिमान पक्षाच्या स्थापनेनंतर काही महिन्यांतच भाजपाकडून राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्त झाले आहेत.राणेंच्या स्वाभिमान पक्षाचा केंद्रात नरेंद्र मोदींच्या ‘एनडीए’ला पाठिंबा आहे. त्यामुळे राज्यसभेवर खासदार असणारे नारायण राणे पुन्हा एकदा २0१४ च्या निवडणुकीप्रमाणे कुडाळ-मालवण मतदार संघातून निवडणूक लढतात की नाही ? हा सिंधुदुर्गसह राज्यभरात चर्चेचा विषय आहे. सलग सहा वेळा विधानसभेत विक्रमी मताधिक्याने निवडून येणाºया नारायण राणे यांचा शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी २0१४ च्या विधानसभा निवडणुकीत १0 हजारांच्या मताधिक्याने पराभव केला होता. त्यानंतर वर्षभराच्या कालावधीत बांद्रा येथील पोटनिवडणुकीत नारायण राणे काँग्रेसकडून पुन्हा विधानसभेच्या रिंगणात होते. मात्र, त्या निवडणुकीतही राणे यांचा पराभव झाला होता.

दीपक केसरकर यांच्यासाठी सावंतवाडीत प्रतिष्ठेची लढाई
२00९ ची निवडणूक राष्ट्रवादी तर २0१४ ची निवडणूक शिवसेना अशा दोन पक्षांमधून दोन वेळा आमदार झालेले पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासाठी २0१९ ची तिसरी निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची आहे. सावंतवाडी मतदार संघात शिवसेनेप्रमाणेच भाजपाने मोठ्या प्रमाणावर पाय रोवले असून सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्याचा प्रत्यय आला. त्यामुळे युती झाली तर केसरकरांना फायदा होईल. मात्र, स्वतंत्ररित्या लढले तर भाजपा, स्वाभिमान आणि इतर सर्व पक्षांविरोधात लढताना केसरकरांसमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे.

इच्छुकांची भाऊगर्दी : विधानसभेच्या कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या तिन्ही मतदार संघात भाजप, स्वाभिमान या दोन्ही पक्षांकडून इच्छुकांची भाऊगर्दी आहे. त्यात माजी आमदार, इतर पक्षांतून प्रवेश केलेली नेतेमंडळी, युवा नेते म्हणून वावरणारी मंडळी यांचा मोठा सहभाग आहे.

बबन साळगावकर काय करणार ? : दीपक केसरकर यांचे कट्टर समर्थक असलेले सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर नेमकी कोणती भूमिका घेणार ? याकडे सर्व जिल्हावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. साळगावकर यांनी केसरकरांच्याविरोधात बंड पुकारले असून सर्व विरोधी पक्षांना एकत्र करून ते निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत.

गत निवडणुकीच्या निकालावर एक नजर

कणकवली

नीतेश राणे, काँग्रेस ७४७१५

प्रमोद जठार, भाजपा ४८७३६

सुभाष मयेकर १२८६३

अतुल रावराणे   ८१९६

२००९ : प्रमोद जठार (भाजपा)

कुडाळ

वैभव नाईक, शिवसेना ७०५८२

नारायण राणे, काँग्रेस  ६०२०६

विष्णू मोंडकर, भाजपा   ४८१९

पुष्पसेन सावंत, राष्ट्रवादी   २६९२

२००९ : नारायण राणे (काँग्रेस)

सावंतवाडी

दीपक केसरकर, शिवसेना ७0९0२

राजन तेली, भाजपा  २९७१0

चंद्रकांत गावडे, काँग्रेस    २५३७६

सुरेश दळवी, राष्ट्रवादी काँग्रेस      ९0२९

२००९ : दीपक केसरकर (राष्ट्रवादी)

तिन्ही मतदार संघात चुरस.

मागील निवडणुकीत नीतेश राणे व वैभव नाईक हे दोन नवीन चेहरे विधानसभेत पोहोचले होते.

Web Title: Mathematics will be clear only after Sena-BJP alliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.