Sindhudurg: देवगड तालुक्यात आंबा कलमांना जूनमध्येच बहारदार पालवी, बागायतदारांच्या आशा पल्लवित
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: June 10, 2025 19:36 IST2025-06-10T19:35:27+5:302025-06-10T19:36:09+5:30
मे महिन्यात पडलेल्या पावसाचा परिणाम

Sindhudurg: देवगड तालुक्यात आंबा कलमांना जूनमध्येच बहारदार पालवी, बागायतदारांच्या आशा पल्लवित
अयोध्याप्रसाद गावकर
देवगड : यावर्षी पावसाने मे महिन्याच्या २० तारीखलाच सुरुवात झाल्याने तालुक्यामध्ये आंबा कलमांना जून महिन्याच्या सुरुवातीला बहारदार अशी पालवी येण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे तालुक्यातील सर्व हापूस कलमे बहारदार पालवीने सजल्याचे दिसून येत आहे.
तालुक्यातील ८० टक्क्यांहून अधिक कलमांना बहारदार अशी पालवी आल्याचे दिसून येत आहे. ही पालवी टिकविण्यासाठी व किडींपासून संरक्षण मिळण्यासाठी कीटकनाशक फवारण्या बागायतदार करीत असल्याचेही दिसून येत आहे. पूर्वी चैत्र महिन्यामध्ये आंबा कलमांना पालवी येण्याचे प्रमाण जास्त होते.
गेल्या काही वर्षांपासून आंबा कलमांना चैत्र महिन्याऐवजी कलम मोहरण्याच्या वेळेला म्हणजेच नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात पालवी येत होती. यामुळे आंबा उत्पादनावर याचा मोठा परिणाम होत होता. मात्र, यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीलाच बहारदार अशी आंबा कलमांना पालवी आली आहे.
पालवी टिकविण्यासाठी बागायतदार सक्रिय
ही पालवी टिकविण्यासाठी कीटकनाशक फवारण्या येथील बागायतदार करीत आहेत, तसेच कलमांना खते घालण्याची कामेदेखील बागायतदार करीत आहेत. या आलेल्या पालवीचे कीटकांपासून संरक्षण होऊन पालवी टिकल्यास येणारे आंबा पीक हे समाधानकारक येऊ शकते, असे मत जाणकार आंबा बागायतदारांमधून व्यक्त करण्यात येत आहे.
बहारदार पालवीने बागायतदारांच्या आशा पल्लवित
आंबा कलमांना आलेल्या बहारदार पालवीला ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यामध्ये दुबार पालवी न येता या कलमांना मोहरच येऊ शकतो. गेल्या काही वर्षांचा आढावा घेतला असता देवगड हापूस कलमांना आंबा मोहर येण्याच्या वेळेलाच नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये जास्त प्रमाणात पालवी येत होती. यामुळे उत्पादनावर परिणाम होत होता. यावर्षी मात्र तालुक्यामध्ये आलेल्या बहारदार पालवीमुळे आंबा बागायतदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.