पेट्रोलपंपावरील पेट्रोल व डिझेल भरण्याचे पाईप पारदर्शक करावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 14:01 IST2019-03-29T14:00:45+5:302019-03-29T14:01:51+5:30
सर्व पेट्रोल पंपांवरील पेट्रोल, डिझेल भरण्यासाठीचे पाईप पारदर्शक करावेत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितिच्यावतीने केंद्रीय पेट्रोलियम आणि गॅस मंत्रालयाकडे करण्यात आली असून या मागणीचे लेखी निवेदन सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

पेट्रोलपंपावरील पेट्रोल व डिझेल भरण्याचे पाईप पारदर्शक करावेत
सिंधुदुर्गनगरी : पेट्रोलपंपांवर ज्या पाईपमधुन पेट्रोल किंवा डिझेल भरले जाते. तो पाइप पारदर्शक नसून काळा असतो. त्यामुळे नक्की पेट्रोल जाते की केवळ मशीनमधील आकडे हलतात, हे ग्राहकांना कळत नाही. त्यामुळे हे पेट्रोल भरणारे पाईप पारदर्शक असतील तर या पाईपमधुन पेट्रोल, डिझेल वाहताना दिसू शकते.त्याची गती कमी अधिक होणे किंवा थांबणे या सर्व बाबी ग्राहकाला स्वःताच्या डोळ्यांनी पाहता येतील.त्यामुळे संभाव्य गैरप्रकारांना आळा बसेल.
यासाठी सर्व पेट्रोल पंपांवरील पेट्रोल, डिझेल भरण्यासाठीचे पाईप पारदर्शक करावेत, अशी मागणी हिंदु जनजागृती समितिच्यावतीने केंद्रीय पेट्रोलियम आणि गॅस मंत्रालयाकडे करण्यात आली असून या मागणीचे लेखी निवेदन सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
या निवेदनात, दैनंदिन जीवनावश्यक वस्तुंप्रमाणे पेट्रोल - डिझेल हा सुद्धा आवश्यक घटक आहे. मात्र आपल्याकडे बऱ्याच वेळा पेट्रोल कमी देणे, भेसळयुक्त पेट्रोल देणे अशाप्रकारे ग्राहकांची फसवणूक होत असल्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यामुळे या सर्वांवर आळा घालून ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी आणि पेट्रोल पंप धारकांची मनमानी थांबविण्यासाठी एक महत्त्वाचा उपाय म्हणून पेट्रोल पंपांवर ज्या पाईप मधून पेट्रोल किंवा डिझेल भरले जाते.
तो पाईप पारदर्शक करावा, ग्राहकांची फसवणुक आणि भेसळ करणाऱ्या पंपचालकांची मान्यता रद्द करावी, त्यांच्याकडे अन्य पंपांचा परवाना असल्यास तोही रद्द करावा, आर्थिक दंड आदी कठोर तरतुदी ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत करण्यात याव्यात आशी मागणी करण्यात आली आहे.