घराला आग लागून मोठे नुकसान, मालवण मेढा येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 13:58 IST2020-11-12T13:57:12+5:302020-11-12T13:58:20+5:30
fire, sindhudurgnews मालवण शहरात मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे एक झाड आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याच्या घटनेला अवघे काही तास उलटत नाहीत तोच सोमवारी सायंकाळी मेढा येथील एका घराला आग लागली. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या या आगीत घराचे व घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.

धुरी कुटुंबीयांचे घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने त्यांच्यावर मोठे संकट कोसळले आहे.
मालवण : शहरात मध्यरात्री शॉर्टसर्किटमुळे एक झाड आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याच्या घटनेला अवघे काही तास उलटत नाहीत तोच सोमवारी सायंकाळी मेढा येथील एका घराला आग लागली. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या या आगीत घराचे व घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, मालवण नगरपालिकेकडे सद्यस्थितीत उपलब्ध नसलेल्या अग्निशमन यंत्रणेचा प्रश्न चोवीस तासांत घडलेल्या आगीच्या दोन घटनांमुळे ऐरणीवर आला आहे. मेढा येथील जयप्रकाश धुरी हे आपल्या पत्नी व दोन मुलींसह झोपडीवजा घरात राहतात. सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास जयप्रकाश हे घरात झोपले होते. तर पत्नी व मुली बाहेर गेल्या होत्या.
यावेळी घरातून आगीचे लोट बाहेर येत असल्याचे शेजाऱ्यांना दिसून आले. लागलीच शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी तिथे धाव घेत पाण्याच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला. जयप्रकाश यांनाही सुखरूप बाहेर काढण्यात आले. मोठ्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र, घरातील साहित्य जळून मोठे नुकसान झाले आहे. प्रभागाचे नगरसेवक गणेश कुशे यांनीही त्याठिकाणी धाव घेत मदतकार्यात सहभाग घेतला.