सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणी भाषा भवन उभारूया, मंत्री नितेश राणे यांचे आवाहन

By अनंत खं.जाधव | Updated: March 22, 2025 16:07 IST2025-03-22T16:07:05+5:302025-03-22T16:07:50+5:30

साहित्यिकांनी संवाद करावा मार्ग निघेल, सावंतवाडीत कोमसापचे जिल्हास्तरीय साहित्य संमेलन

Let's build a Malvani Bhasha Bhavan in Sindhudurg district, appeals Minister Nitesh Rane | सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणी भाषा भवन उभारूया, मंत्री नितेश राणे यांचे आवाहन

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणी भाषा भवन उभारूया, मंत्री नितेश राणे यांचे आवाहन

सावंतवाडी : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी कोकणातील साहित्यिकाचा मोठा वाटा आहे. त्यामुळेच आज मुंबईत मराठी भाषा भवन उभे राहात आहे. ही आनंदाची बाब असून आता कोकणातील साहित्यिकांनी पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवणी भाषा भवन उभारूया आणि येथील साहित्याचा गौरव करूया. साहित्यिकांनो तुम्ही माझ्याशी संवाद साधा संवादातून मार्ग निघतो. युवा पिढीला मोबाईल देण्याऐवजी पुस्तक देऊया असे आवाहन राज्याचे मत्स्य बाब बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी केले.

कोकण मराठी साहित्य परिषदेकडून आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन मंत्री राणे यांच्या हस्ते झाले यावेळी  साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ नाट्य लेखक गंगाराम गवाणकर, कोमसाप अध्यक्षा नमिता कीर, डॉ. प्रदीप ढवळ, मंगेश म्हस्के, उषा परब, मनीष दळवी, जिल्हाधिकारी अनिल पाटील, रवींद्र खेबुडकर, प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार श्रीधर पाटील, सावंतवाडी तालुकाध्यक्ष ॲड. संतोष सावंत, डॉ. मिलिंद कुलकर्णी, शेखर सामंत, वृंदा कांबळी, ॲड. नकुल पार्सेकर, रुजारिओ पिंटो अभिमन्यू लोंढे राजू तावडे उपस्थित होते.

पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज साहित्य नगरी सावंतवाडीतील बॅरिस्टर नाथ पै  सभागृहाच्या विद्याधर भागवत व्यासपीठावर  कोकणातील ग्रंथालय व साहित्यिक चळवळीवर जोरदार चर्चा झाली.

राणे म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी कोकण मराठी साहित्य परिषद व कोकणाने फार मोठे योगदान दिले आहे. गंगाराम गव्हाणकर तसेच मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी यांनी आपली मालवणी मायबोली साता समुद्रा पार नेली. याच मालवणी भाषेचे सुद्धा जतन करणे हे आमचे कर्तव्य असून त्या दृष्टीने लवकरच कोकणात मालवणी भाषा भवन उभारण्याचा माझा मानस आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करूया संमेलनाच्या माध्यमातून आपलं कोकण व कोकणातील साहित्य सर्व दूर नेण्याचे काम केलं जातं. त्यादृष्टीने कोकणातील असलेल्या साहित्याचे जतन व्हावे तसेच नवनवीन साहित्यिक निर्माण व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

मी विचारांची लढाई लढतोय 

मी आज या देशात व राज्यात विचारांची लढाई लढत आहे. मी आमदार व मंत्री असलो तरीही मी प्रथम हिंदू आहे व ती माझी भूमिका स्पष्ट आहे. मात्र असे असले तरीही या जिल्ह्याचा पालकमंत्री अर्थात सरकारचा प्रतिनिधी म्हणून या जिल्ह्यातील साहित्य चळवळ वृद्धिंगत होण्यासाठी माझे जास्तीत जास्त प्रयत्न राहतील व पुढील वर्षी येणाऱ्या साहित्य संमेलनाच्या पूर्वी या जिल्ह्यातील साहित्यसंपदा असलेल्या ग्रंथालयांमध्ये निश्चितच आमुलाग्र बदल झालेले दिसतील असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. 

मधू मंगेश कर्णिक यांना महाराष्ट्र भूषण द्या

कोमसापचे जिल्हाध्यक्ष मंगेश म्हस्के यांनी कोमसापचे  संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात यावा असे आवाहन केले. तसेच कोकणातील साहित्य संस्कृतीचा ठेवा जतन करण्यासाठी देखील शासनाकडून सहकार्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली. 

Web Title: Let's build a Malvani Bhasha Bhavan in Sindhudurg district, appeals Minister Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.