कुडाळला पुराचा धोका कायम
By Admin | Updated: July 17, 2014 23:08 IST2014-07-17T23:03:39+5:302014-07-17T23:08:42+5:30
आंबेडकर नगरमधील समस्या : नदीपात्रालगत बांधकामांना परवानगी ठरतेय मारक

कुडाळला पुराचा धोका कायम
रजनीकांत कदम - कुडाळ
कुडाळ तालुक्यातील भंगसाळ नदीला दरवर्षी पूर येतो. नदीचे वाढलेले पाणी ज्या परिसरात पसरते त्याठिकाणी नवीन इमारतींची बांधकामे करण्यात येत आहेत. त्यामुळे यावर्षी भंगसाळ नदीला पूर आल्यास पुराचे पाणी अन्यत्र पसरणार आहे. कुडाळ येथील बाबासाहेब आंबेडकर नगर येथील दहा ते बारा घरांना या पुराच्या पाण्याने काही दिवसांपूर्वी वेढा दिला होता. मात्र, पावसाने काही काळ विश्रांती घेतल्याने कोणतेही अघटीत घडले नाही. परंतु, पुन्हा रात्री अपरात्री पूर आल्यास ही घरे पाण्याखाली जाण्याचा धोका कायम आहे.
भंगसाळ नदी कुडाळ शहराच्या बाजूने वाहत आहे. कुडाळ शहर भौगोलिकदृष्ट्या सखल व मैदानी प्रकारचे असल्याने पावसाळ्यात नदीला पूर आल्यास त्याचे पाणी कुडाळ शहराच्या आजूबाजूच्या परिसरात पावशी, पिंगुळी व अन्य ठिकाणी पसरते. भंगसाळ नदीला पूर आल्यास महामार्गावरील वाहतूकही काही काळ बंदावस्थेत असते. याचा फटका कुडाळवासीयांनाच जास्त बसतो. कुडाळ तालुक्यात सुमार पाऊस असला आणि सह्याद्री पट्ट्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तरिही भंगसाळ नदीला पूर येतो. त्यामुळे पूर केव्हा येईल, याबाबत शक्यता वर्तविता येत नाही. पुराचे पाणी शहरातील आंबेडकर नगर, भैरववाडी, मस्जिद मोहल्ला, लक्ष्मीवाडी, केळबाईवाडी तसेच अन्य ठिकाणी घुसते. यामध्ये आंबेडकर नगर वसलेल्या ठिकाणी शेतजमिनी असल्याने या नगराला जास्त धोका संभवतो.
दरवर्षी पुराचे पाणी येत असे त्याठिकाणी शेतजमिनीच होत्या. त्यामुळे घरादारात पाणी घुसण्याचे प्रकार कमी होते. मात्र, सद्यस्थितीत ज्या शेतजमिनींमध्ये पुराचे पाणी पसरत असे त्याठिकाणीच नॉट अॅप्लिकेबल क्षेत्र मानून प्लॉटिंग करण्यात आले आहे. त्याठिकाणी मोठमोठ्या इमारती उभारण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. या जमिनीवर इमारती उभारणीसाठी यावर्षी मातीचा भराव टाकण्यात आला आहे.
पुराच्या पाण्यामुळे शहरातील काही भागातील घरांना तडे गेले आहेत. तसेच पाणी घरात घुसून जमीन खचणे व सामानाचीही नुकसानी झाली आहे.
यानंतरही शासनाकडून नुकसान भरपाई मिळालेली नसून रहिवाशांनी घरांची तात्पुरती डागडुजी केली आहे. यावर्षी मातीचा भराव टाकण्यात आल्याने पुराच्या पाण्यात मोठी वाढ होणार असल्याचे दिसत आहे. शासनाने अशा पूरग्रस्त भागातील नागरिकांकरिता उपाययोजना करणे गरजेचे आहे. कारण, भर पावसात संसार उघड्यावर टाकून कोणीही स्थलांतर करत नाही. त्यामुळे शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
शासनाचा अजब कारभार
पूरस्थिती उद्भवणाऱ्या ठिकाणच्या नागरिकांना शासन स्थलांतरीत होण्याचे सल्ले देते. परंतु, या नागरिकांची कोणतीही सोय शासन करत नाही. पूर्वापारपासून या भागात राहणाऱ्या नागरिकांना स्थलांतर करण्यास सांगणारे शासन नदीपात्रालगतच्या भागांमध्ये इमारती बांधण्याची परवानगी का नाकारत नाही? पुराचे पाणी पसरणाऱ्या ठिकाणी इमारती बांधण्यास परवानगी शासनच देते आणि ते पाणी अन्यत्र घुसल्यास त्याची जबाबदारीही टाळते, असा शासनाचा गोंधळात टाकणारा कारभार सुरु आहे.
-पुराचे पाणी पसरणाऱ्या क्षेत्रात नव्याने बांधकामे करण्यात येणार आहेत.
-जमीन मालकांनी या ठिकाणी उंच भाग करण्यासाठी मातीचा भराव टाकला आहे.
-यामुळे या परिसरात पाणी येण्याचे प्रमाण कमी होणार आहे.
-मात्र, पूरस्थितीमध्ये याठिकाणी जे पाणी पसरत असे त्या पाण्याचा प्रवाह बदलणार असून पुराचे पाणी अन्यत्र नागरिकांच्या वस्तीत घुसणाच्या संभव आहे.
-नदीपात्राजवळ वाढत जाणाऱ्या बांधकामांमुळे आंबेडकर नगराला धोका निर्माण झाला आहे.
४पुराच्या पाण्यामुळे यावर्षी मुसळधार पावसात येथील काही घरांना पाण्याने वेढा दिला होता.
४काही घरातील माणसांनी सामानाची बांधाबांध करत स्थलांतराची तयारी ठेवली होती.
-मात्र, काहीवेळाने पाऊस थांबल्याने पाणी ओसरले.
-येथील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. परंतु, पावसाळ्यात पुन्हा पुराची स्थिती निर्माण झाल्यास घरांमध्ये पाणी शिरण्याची भीती कायम आहे.
-या वस्तीतील नागरिकांनी पूर आल्यास काय करावे, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.