शेवंड टिकवण्यासाठी ‘त्यांची’ दहा वर्षे धडपड
By Admin | Updated: March 23, 2015 00:38 IST2015-03-22T23:16:57+5:302015-03-23T00:38:20+5:30
अस्लम अकबानी : हर्णै बंदरात माशांची आवक वाढली

शेवंड टिकवण्यासाठी ‘त्यांची’ दहा वर्षे धडपड
शिवाजी गोरे - दापोली -समुद्रात सरसकट मासेमारी करुन अनेक जातीच्या माशांच्या उत्पत्तीवर घाला घालण्यात येत असल्याने माशांच्या अनेक जाती नामशेष होऊ लागल्या आहेत. ज्यांचा उदरनिर्वाह या मासेमारीवर चालतो, त्यांच्यामध्येच ही जागृती करण्यासाठी एक मासळी व्यावसायिकच पुढे आला आहे. दापोली तालुक्यातील हर्णै बंदरात मोठ्या प्रमाणावर आढळणाऱ्या शेवंडची जात नष्ट होऊ नये, यासाठी मासळी व्यावसायिक अस्लम अकबानी यांनी पुढाकार घेतला आहे. मच्छिमारांच्या जाळ्यात सापडलेल्या शेवंडची पिल्ले आणि मादी विकत घेऊन ती परत समुद्रात सोडण्याचे व्रत गेली १० वर्षे ते जोपासत आहेत.
परकीय चलन मिळवून देणारे शेवंड हर्णै बंदरात मोठ्या प्रमाणावर आढळून येते. याच बंदरात शेवंडची सर्वाधिक आवक आहे. या बंदरातील शेवंडची सरसकट मासेमारी केली जात होती. त्यामुळे परकीय चलन मिळवून देणारे शेवंड नामशेष होण्याची भीती व्यक्त केली जात होती. परंतु या बंदरातील मासळी व्यावसायिक माजी सरपंच अस्लम अकबानी यांनी शेवंडच्या शाश्वत मासेमारीसाठी पुढाकार घेतला. मच्छिमारांचे कोणतेही नुकसान होऊ नये म्हणून ते मच्छिमारांकडून शेवंड खरेदी करतात आणि त्यातून छोटी पिले व मादीला जीवदान देतात. सलग दहा वर्षे त्यांचा हा उपक्रम सुरू आहे. हर्णै बंदरात शेवंडची मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांना १० वर्षांपासून जागृत करण्याचे काम अकबानी यांच्याकडून सुरु आहे. जाळ्यात सरसकट शेवंड आला तरीही सरसकट मासेमारी केली जात नाही. शेवंडची मादी जगली तरच भविष्यात शेवंडची उत्पत्ती वाढेल, अशा प्रकारचे महत्व ते मच्छिमारांना पटवून देत आहेत.
भविष्यात शेवंड नामशेष होऊ नये, शेवंड जाळ्यात पकडल्यानंतर तो दोन दिवससुद्धा जिवंत राहू शकतो. समुद्राच्या पाण्यातील शेवंडला गोड्या पाण्यात टाकल्यावर तो मरतो. शेवंडला खूप मागणी आहे. परंतु शेवंडची मासेमारी खूप कमी मच्छिमार करतात. जाळ्यात पकडून आणलेला शेवंड जिवंत असतो. काहीवेळा मादीच्या पोटात अंडी व पिलेसुद्धा असतात. अशा मादीला मारल्यास खूप मोठे नुकसान होते. छोटी पिलेसुद्धा मोठी होण्याआधीच जाळ्यात येतात. त्या पिलांमध्येसुद्धा मादी असू शकते. त्यामुळे ३०० ग्रामपेक्षा कमी वजनाच्या पिलंना जीवदान देण्यात येते.
हर्णै बंदरातील मच्छिमारांत शाश्वत मासेमारीसंदर्भात जागृती करण्यात येत असून, समुद्रात सापडलेले छोटे मासे सोडून देण्यात येत आहेत. खेकड्यांची छोटी पिलंही पकडली जात नाही. खेकड्यांच्या मादीलाही सोडून दिले जाते. कमी दर्जाची मासळी समुद्रात सोडून दिली जाते.
शेवंडची एक मादी हजारो अंडी देते. ती अंडी जगण्याचे प्रमाण कमी आहे. शाश्वत मासेमारीतून मादीचा बचाव झाल्यास त्यांची संख्या वाढण्यास मदत होते. समुद्रात मासेमारी करतात, मादी जाळ्यात अडकल्यास तिला पुन्हा समुद्रात सोडावे, असे सांगितले जाते.