पोंभुर्लेत पत्रकारिता महाविद्यालय सुरू करणार - रवींद्र बेडकिहाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 12:00 IST2025-01-07T11:59:37+5:302025-01-07T12:00:10+5:30
३२व्या राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कारांचे वितरण

पोंभुर्लेत पत्रकारिता महाविद्यालय सुरू करणार - रवींद्र बेडकिहाळ
देवगड (सिंधुदुर्ग) : ‘बाळशास्त्रींचे विविधांगी काम आजच्या पत्रकारांनी समजून घेणे आवश्यक आहे. गावोगावी विठ्ठलाची मंदिरे असली तरी जसे पंढरपूरच्या मंदिराला विशेष महत्त्व आहे तसेच महत्त्व पोंभुर्ले येथील स्मारकाला आहे. या मातीतला पुरस्कार पत्रकारांसाठी महत्त्वाचा आहे’ असे सांगून येत्या काळात पोंभुर्ले ग्रामस्थांच्या सहकार्याने येथे पत्रकारितेचे शिक्षण देणारे महाविद्यालय सुरू करण्याचा आमचा संकल्प आहे, असे मत महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रवींद्र बेडकिहाळ यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केले.
‘महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी’तर्फे देण्यात येणाऱ्या राज्यपातळीवरील प्रतिष्ठित ३२व्या राज्यस्तरीय दर्पण पुरस्कारांचे वितरण ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमये, मराठवाडा विभाग साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. जगदीश कदम, गडहिंग्लज येथील ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे यांच्या हस्ते पोंभुर्ले, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग येथे संस्थेने उभारलेल्या ‘दर्पण’ सभागृहात झाले. व्यासपीठावर महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे उपाध्यक्ष कृष्णा शेवडीकर, कार्यकारी विश्वस्त विजय मांडके, महाराष्ट्र राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रकाश कुलथे, पोंभुर्ले गावच्या सरपंच प्रियांका धावडे, उपसरपंच सादीक डोंगरकर, ॲड. प्रसाद करंदीकर, सुधाकर जांभेकर यांची उपस्थिती होती.
मान्यवरांचे स्वागत महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे उपाध्यक्ष कृष्णा शेवडीकर, विश्वस्त अलका बेडकिहाळ, गजानन पारखे, रोहित वाकडे यांनी केले. सूत्रसंचालन विश्वस्त अमर शेंडे यांनी केले. आभार विजय मांडके यांनी मानले.
प्रारंभी बाळशास्त्रींची पालखी वाद्यांच्या गजरात स्मारकामध्ये आणण्यात आली. त्यानंतर दीप प्रज्वलन व बाळशास्त्रींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘दर्पण’ स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते पार पडले.
पोंभुर्लेतील स्मारकात पत्रकारांनी योगदान द्यावे
पोंभुर्ले ही आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांची जन्मभूमी असल्याने येथील महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून सुरू असलेल्या स्मारक कार्यात राज्यातील सर्व पत्रकारांनी आपले योगदान द्यावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ लिमये यांनी केले.
नऊ जणांना पुरस्कारांचे वितरण
यामध्ये लोकमतचे सातारा येथील उपवृत्त संपादक दीपक शिंदे, आचार्य बाळशास्त्री जांभेकर महिला ’दर्पण’ पुरस्कार रत्नागिरी येथील लोकमतच्या वरिष्ठ उपसंपादक / वार्ताहर शोभना कांबळे, श्रीकांत साबळे, नवनाथ कुताळ, विमल नलवडे, ॲड. रोहित अहिवळे, यशवंत खलाटे - पाटील, राज्यस्तरीय ’धाडसी पत्रकार’ पुरस्कार - डॉ. प्रमोद श्रीरंग फरांदे, आचार्य बाळशास्त्री जांभेकर ‘दर्पण’ साहित्यिक पुरस्कार - निर्मलकुमार सूर्यवंशी यांचा समावेश होता. अहिल्यानगर येथील ज्येष्ठ पत्रकार श्रीराम जोशी, ॲड. प्रसाद करंदीकर, पुरस्कारार्थी पत्रकारांच्यावतीने श्रीकांत साबळे, नवनाथ कुताळ यांनी मनोगत व्यक्त केले.