प्रभाग आठवरून शिवसेना-भाजपात वाद

By admin | Published: November 9, 2016 12:36 AM2016-11-09T00:36:30+5:302016-11-09T00:44:22+5:30

देवगड नगरपंचायत : शिवसेना बाजी मारण्यासाठी सज्ज; प्रचारासाठी येणार राज्यातील मंत्री!

The issue of Shiv Sena-BJP from ward eight | प्रभाग आठवरून शिवसेना-भाजपात वाद

प्रभाग आठवरून शिवसेना-भाजपात वाद

Next

अयोध्याप्रसाद गावकर -देवगड -देवगड-जामसंडे नगरपंचायत निवडणुकीदरम्यान देवगड तालुक्यातील शिवसेनेने केलेले पक्षीय बदल या नगरपंचायतीमध्ये फायद्याचे ठरणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत आहे. या निवडणुकीमध्ये शिवसेनेने सहा उमेदवार उभे केले आहेत. सेना-भाजपची युती या नगरपंचायतीत झालेली आहे. मात्र, प्रभाग क्रमांक ८ मध्ये दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जांवरून वाद निर्माण झाला आहे.
मावळत्या देवगड ग्रामपंचायतीमध्ये सेनेचे एकमेव सदस्य असलेले गजानन प्रभू हे उपसरपंच होते. यामुळे उपसरपंचपदाच्या काळात प्रभू यांनी ग्रामपंचायत स्तरावरती बऱ्याचशा प्रमाणात कामे केली आहेत. यामुळे देवगड भागात सेनेचा थोड्याफार प्रमाणात प्रभाव दिसून येतो. जामसंडे ग्रामपंचायतीमध्ये सेनेचा एकही सदस्य नव्हता. देवगड-जामसंडे नगरपंचायत निवडणुकीसाठी शिवसेनेचे सहा उमेदवार रिंगणात आहेत. प्रभाग ६ मध्ये निनाद देशपांडे, प्रभाग ८ मध्ये संतोष तारी, प्रभाग ९ मध्ये श्रीया कदम, प्रभाग ११ मध्ये अर्चना पाटील, प्रभाग १३ मध्ये रोहिणी तोडणकर, प्रभाग १७ मध्ये गजानन प्रभू हे सेनेचे उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. सेना-भाजपची युती असून प्रभाग ८ मध्ये सेनेचे संतोष तारी व भाजपचे सुंदर जगताप हे दोन उमेदवार उभे असल्याने व हे दोन्ही उमेदवार निवडणूक लढविण्याच्या मतावर ठाम असल्याने युतीमध्ये यामुळे तेढ निर्माण झाली आहे.
प्रभाग ६ मध्ये भाजपचे अभिषेक गोगटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने या प्रभागात शिवसेनेने उमेदवारी अर्ज दाखल केलेले निनाद देशपांडे उमेदवारी अर्ज मागे घेणार आहेत. देवगड-जामसंडे नगरपंचायती निवडणुकीदरम्यान तालुकाप्रमुख विलास साळसकर यांची उपजिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करून या ठिकाणी मिलिंद साटम व अ‍ॅड. प्रसाद करंदीकर या दोन देवगड तालुकाप्रमुखांची नियुक्ती शिवसेनेने केली आहे. देवगड, कुणकेश्वर, शिरगाव, किंजवडे या जि. प. मतदारसंघांसाठी साटम यांची नियुक्ती केली आहे, तर पुरळ, पडेल, पोंभुर्ले, बापर्डे या जि. प. मतदारसंघ तालुकाप्रमुखांची जबाबदारी अ‍ॅड. प्रसाद करंदीकर यांच्याकडे दिलेली आहे.
विलास साळसकर यांची अचानक तालुकाप्रमुख पदावरून उपजिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केल्यामुळे साळसकर नाराज आहेत. यामुळे त्यांची नाराजी ही पक्षहिताची की तोट्याची ठरते हे निवडणुकीतच दिसून येणार आहे. शिवसेना देवगड तालुका संपर्कप्रमुख राजेंद्र फाटक व विलास साळसकर यांचे सूत जमत नसल्यामुळेच साळसकर यांची तालुकाप्रमुख पदावरून उपजिल्हाप्रमुखपदी नियुक्ती केली आहे. साळसकर यांना उपजिल्हाप्रमुखपदी बढती मिळाली असली तरी ‘उप’पदांना फारसे महत्त्व नसते. त्यामुळे सध्या साळसकर समर्थक व इतर शिवसैनिक अशी गटबाजी देवगड-जामसंडेत दिसून येत आहे. खासदार विनायक राऊत यांनी देवगड-जामसंडे भागासाठी आपला बराचसा निधी दिल्याने शिवसेनेला बळकटी मिळत आहे. तसेच मुंबई बेस्टचे चेअरमन व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे संपर्कप्रमुख अरुणभाई दुधवडकर, शिवसेनेचे उपसंपर्कप्रमुख सुभाष मयेकर हे देवगड तालुक्याचेच सुपुत्र असल्याने देवगड-जामसंडे नगरपंचायतीमध्ये जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावणार आहेत.
शिवसेनेचे प्रभाग १७ मधील उमेदवार गजानन प्रभू आणि प्रभाग १३ मधील रोहिणी तोडणकर यांची उमेदवारी सेनेच्या दृष्टिकोनातून प्रतिष्ठेची आहे. प्रभू यांनी देवगड ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंचपद भूषविलेले आहे, तर रोहिणी तोडणकर या देवगड अर्बन बँकेच्या माजी संचालिका आहेत. राज्यात सेना-भाजपची सत्ता असल्याने बरेचसे मंत्री यावेळी सेनेच्या प्रचारासाठी येणार असल्याचे बोलले जात आहे. यामुळे महाराष्ट्रात असलेल्या सेना-भाजपच्या सत्तेचा उपयोग देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या निवडणुकीत सेनेला होणार आहे का? हे येणार काळच ठरविणार आहे.

Web Title: The issue of Shiv Sena-BJP from ward eight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.