सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत कर्जप्रक्रियेत दबंगशाही, माजी आमदार राजन तेली यांचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 13:35 IST2025-12-15T13:34:16+5:302025-12-15T13:35:12+5:30
कारवाईसाठी उपमुख्यमंत्र्यांची घेतली भेट, उच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्याचा इशारा

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत कर्जप्रक्रियेत दबंगशाही, माजी आमदार राजन तेली यांचा गंभीर आरोप
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँकेत कर्ज देण्याच्या प्रक्रियेत गडबड सुरू असल्याचा मोठा आरोप माजी आमदार राजन तेली यांनी केला आहे. बँकेतील कर्ज वितरण चुकीच्या मार्गाने होऊन सहकारी संस्थेची प्रतिष्ठा धोक्यात येत असल्याचे ते म्हणाले. या प्रकरणी बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांच्यावर दबंगशाही राबवण्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे.
सोमवारी (दि.१५) कणकवली येथील आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत राजन तेली यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेतील कर्जवाटप व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून त्यासाठी तातडीने अध्यक्ष, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक मंडळ बरखास्त करावे, अशी मागणी त्यांनी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. लवकरच याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेण्याचा त्यांनी इशारा दिला.
त्यांनी एका उद्योजकाला दिलेल्या कर्जाची सविस्तर माहिती देत म्हटले की, या व्यक्तीला वेगवेगळ्या माध्यमातून एकूण ५९ कोटी रूपये कर्ज दिले गेले असून ज्याच्यावर तारण ठेवलेली जागेची किंमत फक्त ८८ लाख रुपये आहे. त्यामुळे तारणाचे खरेदीखत अत्यंत संशयास्पद असल्याचे ते म्हणाले.
...यामुळे सहकार बिघडेल
राजन तेली म्हणाले की, बँक टिकली पाहिजे अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे, पण अशा प्रकारे कर्ज देणे सहकारी संस्थेच्या मुळ तत्वाला हानी पोहोचवणार आहे. जिल्ह्यातील २३४ पतसंस्था आणि जवळपास हजारो सभासद यांचे मोठे नुकसान होऊ शकते.
चार वर्षांचे कर्ज व्यवहार तपासण्याची मागणी
राजन तेली यांनी मागील चार वर्षांच्या सर्व कर्ज व्यवहारांची चौकशी करून गडबडी रोखावी, असे आवाहन केले. "बँकेच्या सध्याच्या नेतृत्वाखाली बँकेची लूट चालू आहे. यशवंत सहकारी बँकेप्रमाणे गंभीर गुन्हे दाखल होणे आवश्यक आहे. पोलिसांमार्फत चौकशी होऊन दोषींवर कारवाई होणे गरजेचे आहे," असेही ते म्हणाले.
सर्वात महागडा गोठा
वेंगुर्ला तालुक्यातील भोगवे येथील एका गोठ्याची किंमत ३१ कोटी रुपये दाखल केलेली आहे, जी जगातील सर्वात महागडी गोठा म्हणून ओळखली जाऊ शकते. याच गोठ्यास तारण ठेवण्यात आले असून या प्रकरणात शेतमांगरांसाठी वाटप करण्यात आलेल्या पैशांबाबत सुद्धा गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत, असे त्यांनी नमूद केले.
उच्च न्यायालयातही याचिका दाखल करण्याचा इशारा
राजन तेली म्हणाले की, आमच्याकडे या आरोपांचे पुरावे आहेत आणि आम्ही याबाबत अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत, पण सहकार खाते आणि नाबार्ड यांकडून कोणतीही कारवाई झाली नाही. बँकेला यापूर्वी दोन लाखांचा दंडही झाला होता. जर यामध्ये त्वरित योग्य ती कारवाई झाली नाही, तर आम्ही उच्च न्यायालयात याचिका दाखल करू.