सदस्यत्वाची मुदत संपूनही निमंत्रण

By Admin | Updated: November 3, 2014 23:24 IST2014-11-03T21:43:37+5:302014-11-03T23:24:56+5:30

महिला, बालविकास समितीचे अज्ञान चव्हाट्यावर

Invitation without end of subscription period | सदस्यत्वाची मुदत संपूनही निमंत्रण

सदस्यत्वाची मुदत संपूनही निमंत्रण

सिंधुदुर्गनगरी : महिला व बालविकास समिती सदस्यत्वाची मुदत संपून ४० ते ४५ दिवस झाले असतानाही शिल्पा घुर्ये यांना प्रशासनाने सभेचे निमंत्रण दिल्याने जिल्हा परिषद प्रशासनाचा अज्ञानपणा चव्हाट्यावर आला आहे. या विषयासंदर्भात सदस्या वंदना किनळेकर यांनी प्रशासनाला विचारले असता प्रशासनाच्यावतीने हा सर्व प्रकार अनावधानाने झाल्याचे सांगत विषयावर पडदा टाकला.जिल्हा परिषदेची महिला व बालविकास समितीची तहकूब सभा जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली येथील बॅ. नाथ पै सभागृहात सोमवारी संपन्न झाली. यावेळी सदस्य वंदना किनळेकर, रूक्मिणी कांदळगावकर, शिल्पा घुर्ये, जिल्हा महिला बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते. कुडाळ तालुक्याच्या तत्कालिन सभापती शिल्पा घुर्ये या महिला व बालविकास या समितीवर सदस्य म्हणून होते. त्यांच्या सभापतीपदाची मुदत १२ सप्टेंबर रोजी संपल्याने या समिती सदस्यत्वाची ही मुदत त्याचवेळी संपली होती. असे असतानाही आज महिला व बालविकास समितीच्या सभेत घुर्ये या हजर होत्या. याबाबत सदस्य किनळेकर यांनी विचारले असता प्रशासनाच्यावतीने असे सांगण्यात आले की, हा सर्व प्रकार अनावधाने घडला आहे. घुर्ये म्हणाल्या की, मला या बैठकीबाबत प्रशासनाकडून दोन ते तीनवेळा भ्रमणध्वनीमार्फत कॉल आले. तरीही ही सर्व बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली तरीही बैठकीचे निमंत्रण मिळाल्याने आपण या बैठकीस उपस्थित राहिले.
...तर सदस्यत्वाचा देणार राजीनामा
आजच्या सभेचे मला प्रोसिडींग मिळाली नाही. अचानक सकाळी बैठकीदरम्यान मला सांगण्यात आले. तर गेल्या तीन सभांचे मला प्रोसेडीग मिळालेले नाही. तसेच बैठकीमध्ये विविध प्रश्नांची चर्चा केली जाते. त्यात मी मांडलेल्या सूचना या इतिवृत्तात येत नाहीत, असा आरोप सदस्या वंदना किनळेकर यांनी करीत यापुढे असा प्रकार घडल्यास सदस्य त्याचा राजीनामा देणार असल्याचा इशाराही वंदना किनळेकर यांनी दिला आहे.
अंगणवाडी सेविकांची १२ पदे रिक्त
जिल्हाभरातून अंगणवाडी सेविकांची बारा पदे रिक्त असून ती पदे भरती लावून भरली जाणार आहे. त्यादृष्टीने योग्य ती कार्यवाही सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
कराटे प्रशिक्षण तत्काळ सुरू करा
दोडामार्ग व देवगड तालुका सोडला तर उर्वरित सहा तालुक्यामध्ये कराटे प्रशिक्षणाला सुरूवात झालेली नाही. याबाबत योग्य ती कार्यवाही करा व तत्काळ कराटे प्रशिक्षण सुरू करा, असे आदेश जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजीत देसाई यांनी महिला व बालविकास विभागाला दिले.
महिला व बालविकास विभागामार्फत हजारो महिलांना रोजगार प्रशिक्षण दिले जाते. मात्र त्यापैकी किती महिलांना रोजगार मिळतो याबद्दल मात्र या विभागाजवळ माहिती नाही. त्यामुळे त्याचा सर्व्हे करा, तशी माहिती पुढील बैठकीत द्यावी, असे आदेश रणजीत देसाई यांनी दिले. (प्रतिनिधी)

Web Title: Invitation without end of subscription period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.