शाळांना इंटरनेट सुविधा देणार
By Admin | Updated: November 12, 2014 23:58 IST2014-11-12T20:50:41+5:302014-11-12T23:58:42+5:30
गुरूनाथ पेडणेकर : शिक्षक समितीला आश्वासन

शाळांना इंटरनेट सुविधा देणार
सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील १४४ केंद्रशाळांमध्ये इंटरनेट सुविधा पुरवली तर वेतनप्रणाली, शिष्यवृत्ती परीक्षा फॉर्म आॅनलाईन भरणे, समाजकल्याण शिष्यवृत्ती फॉर्म आॅनलाईन भरणे तसेच इतर शैक्षणिक माहिती आॅनलाईन भरणे सोयीस्कर होईल. ही बाब नूतन शिक्षण सभापती गुरूनाथ पेडणेकर यांच्या भेटीत त्यांच्याशी चर्चा करताना शिक्षक समितीच्यावतीने मांडण्यात आली. चर्चेअंती १४४ शाळांना इंटरनेट सुविधा देण्याचे सभापती यांनी आश्वासन संघटनेस दिले.
प्राथमिक शिक्षक समितीच्यावतीने जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच नूतन शिक्षण सभापती, वित्त व बांधकाम सभापती, यांची भेट घेऊन शुभेच्छा देण्यात आल्या. ७ नोव्हेंबर २०१२ व २९ डिसेंबर २०१२च्या आदेशाने शिक्षकांचे वेतन प्रदान करण्यासाठी शालार्थ वेतन प्रणालीप्रमाणे कार्यवाही सुरू झाली. सर्व शाळांना जिल्हा परिषदेमध्ये इंटरनेट सुविधा पुरविण्याबाबत शासनाने कळविले. परंतु शाळांची संख्या जास्त असल्याने सर्व शाळांना एकाचवेळी ही सुविधा जिल्हा परिषद पुरवू शकत नाही. याबाबत लक्ष वेधण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजन कोरगांवकर, प्रभारी सरचिटणीस चंद्रसेन पाताडे, राज्य सल्लागार चंद्रकांत अणावकर, शिक्षक नेते भाई चव्हाण, राज्य महिला प्रतिनिधी सुरेखा कदम, सचिव प्रमोद गावडे, उपाध्यक्ष लवू दहिफळे, कणकवली सचिव संतोष कुडाळकर, कुडाळ सचिव सचिन मदने यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी शिक्षकांच्या समस्यांबाबत पदाधिकाऱ्यांशी शिक्षक समिती पदाधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा केली. चर्चेदरम्यान माजी वित्त बांधकाम सभापती अनिल कांदळकर, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सदाशिव ओगले आदी उपस्थित
होते. (प्रतिनिधी)