केसरकरांच्या घरासमोर फटाके फोडण्याचा आग्रह : पोलीस-कार्यकर्त्यांत बाचाबाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2020 19:47 IST2020-01-01T19:46:15+5:302020-01-01T19:47:25+5:30
मात्र, पोलिसांनी त्यास नकार दिला. तरीही काही कार्यकर्त्यांनी फटाके वाजवलेच. त्यामुळे पोलीस निरीक्षक सुनील धनावडे चांगलेच संतापले. मात्र, नंतर वाजवलेले फटाके बाजूला काढल्यानंतर पोलीस व कार्यकर्ते शांत झाले. त्यानंतर मिरवणूक पुढे गेली.

आमदार दीपक केसरकर यांच्या घरासमोर फटाके वाजविण्यावरून पोलीस व भाजप कार्यकर्ते यांच्यात बाचाबाची झाली.
सावंतवाडी : नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत संजू परब विजयी झाल्यानंतर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जोरदार जल्लोष करून विजयी मिरवणूक काढली. ही मिरवणूक शिवाजी चौकातून मुख्य बाजारपेठेत जात असताना आमदार दीपक केसरकर यांच्या घरासमोर काही कार्यकर्त्यांनी फटाके वाजविण्याचा आग्रह केला. मात्र, पोलिसांनी त्यास नकार दिला. तरीही काही कार्यकर्त्यांनी फटाके वाजवलेच. त्यामुळे पोलीस निरीक्षक सुनील धनावडे चांगलेच संतापले. मात्र, नंतर वाजवलेले फटाके बाजूला काढल्यानंतर पोलीस व कार्यकर्ते शांत झाले. त्यानंतर मिरवणूक पुढे गेली.
संजू परब विजयी झाल्यानंतर सावंतवाडी शहरातून मिरवणूक काढण्यात आली होती. जिमखाना मैदानापासून या मिरवणुकीची सुरुवात झाली. मिरवणूक शिवाजी चौकातून मुख्य बाजारपेठेत जाणार होती. तत्पूर्वी आमदार दीपक केसरकर यांच्या घरासमोर मिरवणूक आली असता काही कार्यकर्त्यांनी केसरकर यांच्या घरासमोरच फटाके वाजविण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, पोलिसांनी अगोदरच या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे नगरसेवक मनोज नाईक यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी असे न करण्याच्या सूचना केल्या होत्या.
पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनीही येथे फटाके न फोडता पुढे जाऊन फोडा, असे सांगितले. मात्र, या मिरवणुकीतील काही कार्यकर्ते ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हते. यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यात वादावादीही झाली. मात्र, मिरवणूक जरा पुढे जाताच काही कार्यकर्त्यांनी केसरकर यांच्या घराच्या पुढे फटाके फोडण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलीस निरीक्षक सुनील धनावडे चांगलेच संतापले. त्यांनी संबंधितांवर कारवाई करण्याचा पवित्रा घेतला. मात्र, नंतर काही पदाधिकाºयांनी मध्यस्थी करून यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आणि वाद मिटविला.