उद्योग निरीक्षकास लाच घेताना अटक
By Admin | Updated: July 3, 2014 00:26 IST2014-07-03T00:21:00+5:302014-07-03T00:26:27+5:30
रंगेहात पकडले : ‘लाचलुचपत’ची कारवाई

उद्योग निरीक्षकास लाच घेताना अटक
सिंधुदुर्गनगरी : काजू प्रक्रिया उद्योगासाठी जिल्हा उद्योग केंद्राकडून आवश्यक असलेला दाखला देण्यासाठी ८०० रुपयांची लाच घेताना जिल्हा उद्योग केंद्रातील उद्योग निरीक्षक विलास बाबाजी तेली (वय ५२) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज, बुधवारी रंगेहात पकडले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक जगदीश सातव यांनी व त्यांच्या पथकाने जिल्हा उद्योग कार्यालयात दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास केली.
‘रूपाली कॅश्यू वर्क प्रोडक्ट’ या नावाने कणकवली तालुक्यातील वारगाव येथील हेमंत सदाशिव धनावडे यांना आपला नव्याने व्यवसाय सुरू करावयाचा होता. या व्यवसायासाठी त्यांना जिल्हा उद्योग केंद्राकडून आवश्यक असलेले प्रमाणपत्र हवे होते. यासाठी धनावडे यांनी जिल्हा उद्योग केंद्राकडे मागणी केली होती. मात्र, हा विभाग सांभाळत असलेले उद्योग निरीक्षक विलास तेली यांनी धनावडे यांच्याकडे एक हजार रुपयांची मागणी केली होती. या मागणीनुसार ८०० रुपयांची मांडवली निश्चित झाली होती.
याबाबत हेमंत धनावडे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. या तक्रारीनुसार पथकाने दुपारी ३ वाजून १० मिनिटांच्या सुमारास कार्यालयातच ८०० रुपयांची लाच स्वीकारताना विलास तेली याला रंगेहात ताब्यात घेतले.
तेली याला उद्या, गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सातव यांनी सांगितले. या पथकात सहायक पोलीस उपनिरीक्षक एल. डी. राणे, पोलीस हवालदार बुधाजी कोलगावकर, हवालदार विलास कुंभार, मकसूद पिरझादे, कैतान फर्नांडिस, श्वेता खांडेकर यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)