सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार, नागरिकांना सतर्क राहण्याचे हवामान विभागाचं आवाहन
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: September 10, 2022 20:05 IST2022-09-10T19:52:49+5:302022-09-10T20:05:35+5:30
यलो अलर्ट जारी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची संततधार, नागरिकांना सतर्क राहण्याचे हवामान विभागाचं आवाहन
सिंधुदुर्ग : सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने जोरदार पुनरागमन केले असून बळीराजा सुखावला आहे. राज्याच्या विविध भागात पावसानं हजेरी लावली आहे. जिल्ह्यात आजमितीला २७०० मिलिमीटर पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरीच्या तुलनेत तो कमीच आहे. जिल्ह्यात वार्षिक ४००० ते ४५०० मिलिमीटर पाऊस पडतो.
दरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी बऱ्याच वर्षांनंतर गणेशोत्सवात पावसाने उघडीप दिली होती. अनंत चतुर्दशीच्या रात्रीपासूनच दमदार पावसाने पुनरागमन केले. शनिवारी गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीवेळी पावसानं हजेरी लावल्यानं अनेक ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाला.
यलो अलर्ट जाहीर
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबईसह ठाणे परिसरात पावसानं चांगलीच हजेरी लावल्याचं पाहायला मिळाले. दरम्यान, आजही हवामान विभागानं राज्यात पावसाचा इशारा दिला आहे. आजही संपूर्ण राज्यात हवामान विभागानं पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभागानं केलं आहे.
शेतकरी सुखावला
जिल्ह्यात ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त होता. भातशेती कडक उन्हामुळे करपायला लागली होती. त्यामुळे पावसाची गरज होती.