एकी राहिली तरच बचत गटाच्या माध्यमांतून विकास - मंत्री दीपक केसरकर
By अनंत खं.जाधव | Updated: February 24, 2024 18:36 IST2024-02-24T18:34:57+5:302024-02-24T18:36:14+5:30
सावंतवाडीत तालुकास्तरीय नव तेजस्विनी बचत गट प्रदर्शनाचे उद्घाटन

एकी राहिली तरच बचत गटाच्या माध्यमांतून विकास - मंत्री दीपक केसरकर
सावंतवाडी : महिला बचत गटांमध्ये एकी राहिले पाहिजे तरच त्या स्वतःचा विकास करू शकतात. महिलांनी आपल्या शक्तीचा सदुपयोग कुटुंबाचे उत्पन्न वाढवण्यासाठी केले पाहिजे. सिंधुरत्न मधून व्यवसायासाठी महिलांना कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. यासाठी महिलांनी अर्ज करावेत, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.
मुख्यमंत्री महिला शक्तीकरण अभियाना अंतर्गत नव तेजस्विनी तालुकास्तरीय महिला बचत गट उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन या कार्यक्रमाचे उद्घाटन शनिवारी पार पडले या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी ममता देसाई, गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, नगरपरिषद आरोग्य विभाग अधिकारी कुलकर्णी, जिल्हा समन्वय अधिकारी नितीन काळे, नम्रता झारापकर, मानसी धुरी, श्वेता बगळे, पोलीस निरीक्षक भरत धुमाळ, उदयमती देसाई आदी उपस्थित होते.
केसरकर म्हणाले, महिलांनी स्वतःचे उत्पन्न स्वतः मिळवून यशस्वी झालं पाहिजे. शिक्षण विभागामार्फत काढण्यात आलेल्या नवीन जीआर नुसार शिवणकाम महिलांना देण्यात येणार आहे. काही महिलांना शिवणकामाचे प्रशिक्षणही देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्याचबरोबर १३० महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी सिंधुरत्न मधून कर्ज देण्यात आले आहे. त्यामुळे ज्या महिलांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांनी अर्ज करावेत असे आवाहन केसरकर यांनी केले.
त्याचप्रमाणे पोल्ट्री, देशी गाई, निवास न्याहारी योजना यांसारख्या विविध उद्योगांसाठी महिलांना आर्थिक मदत केली जाईल आपल्या महिला या मेहनती आहेत. त्याचप्रमाणे या कार्यक्रमात वेगवेगळ्या उत्पादनांची विक्रीची सोय येथे केली गेली आहे, त्याचा लाभ ग्रामीण भागातील महिलांनी घ्यावा असे आवाहन ही केसरकर यांनी केले.