दोडामार्ग (जि.सिंधुदुर्ग) : जिल्हा परिषद निवडणुकीचा निकाल लागून गुलाल उडाला असला, तरी काही कर्मचाऱ्यांसाठी ही निवडणूक आता 'डोकेदुखी' ठरू लागली आहे. माटणे मतदारसंघातील केंद्र क्र. ५०/१४ वर नोंदवलेली मते आणि ईव्हीएम मशिनमधील मते यात तफावत आढळल्याने खळबळ उडाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी लक्ष्मण कसेकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत, कर्तव्यात कसुरी करणाऱ्या पाच कर्मचाऱ्यांना थेट 'कारणे दाखवा' नोटीस बजावली आहे.मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीत टेबल क्र. ६ वर हा प्रकार उघडकीस आला. नमुना 'व्हीएम-३' मधील मतांचा हिशोब आणि मशिनमधील आकडे जुळत नसल्याने निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. या गंभीर हलगर्जीपणाबद्दल आता संबंधित कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार आली आहे.
'या' पाच जणांच्या मानेवर कारवाईची तलवार!मतांच्या गणितात घोळ केल्याप्रकरणी प्रशासनाने एकाच वेळी पाच जणांना नोटिसा धाडल्या आहेत. यामध्ये झोनल अधिकारी अमितकुमार कल्याणकर (कनिष्ठ अभियंता), केंद्राध्यक्ष महेश धाकू काळे, तसेच मतदान अधिकारी भीमराव लिंबोरे, अशोक कदम आणि वर्षा काळे यांचा समावेश आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना तातडीने लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
लोकप्रतिनिधित्व कायद्याचा बडगा!निवडणूक कामात हलगर्जीपणा करणे हा केवळ तांत्रिक दोष नसून तो कायदेशीर गुन्हा मानला जातो. या कर्मचाऱ्यांविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील विविध कलमांनुसार कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. "खुलासा समाधानकारक नसल्यास आपले काहीही म्हणणे नाही असे समजून कठोर पावले उचलली जातील," असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
चेंडू आता जिल्हा प्रशासनाच्या कोर्टातसाहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रज्ञा राजमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित पाचही कर्मचाऱ्यांनी आपले लेखी म्हणणे सादर केले आहे. हे खुलासे आता जिल्हा स्तरावर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाचे गांभीर्य पाहता जिल्हाधिकारी यावर काय निर्णय घेतात आणि या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Web Summary : Vote discrepancies in Sindhudurg ZP election lead to notices for five officials. An inquiry is underway due to mismatched EVM data, potentially resulting in legal action and suspension.
Web Summary : सिंधुदुर्ग ZP चुनाव में वोटों की गड़बड़ी के कारण पांच अधिकारियों को नोटिस। ईवीएम डेटा में मिलान न होने से जांच जारी, कानूनी कार्रवाई और निलंबन की संभावना।