कासार्डेत अवैध सिलिका वाळू उत्खनन, कारवाई न झाल्यास धरणे आंदोलन; उद्धवसेनेचा प्रांताधिकाऱ्यांना इशारा
By सुधीर राणे | Updated: May 15, 2025 17:02 IST2025-05-15T16:37:22+5:302025-05-15T17:02:19+5:30
कणकवली प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार

कासार्डेत अवैध सिलिका वाळू उत्खनन, कारवाई न झाल्यास धरणे आंदोलन; उद्धवसेनेचा प्रांताधिकाऱ्यांना इशारा
कणकवली: तालुक्यातील कासार्डे येथे मोठ्या प्रमाणात अवैधरित्या सिलिका वाळू उत्खनन सुरु आहे. यावर कारवाई न झाल्यास प्रांताधिकारी कार्यालयासमोर २० मे रोजी धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा उद्धवसेनेच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी जगदिश कातकर यांना दिला.
उद्धवसेनेच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी जगदिश कातकर यांची आज, गुरुवारी भेट घेतली. यावेळी माजी आमदार वैभव नाईक, राजन तेली, परशुराम उपरकर, सतीश सावंत आदी उपस्थित होते. यावेळी प्रांताधिकाऱ्यांशी चर्चा करुन याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी तहसीलदार दीक्षांत देशपांडे उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, २१ एप्रिल २०२५ रोजी कासार्डे मायनिंग बाबत कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, त्यावर काहीच कारवाई न झाल्याने २ मे रोजी उद्धवसेनेच्या शिष्टमंडळाने याठिकाणी पाहणी केली. त्यावेळी लीज क्षेत्राबाहेरील जमिनीत मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आल्याचे दिसून आले. त्याचे फोटो गुगल नकाशावर देखील दिसत आहेत. त्यामुळे तातडीने ५ मे २०२५ रोजी जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थितीची माहिती करून दिली. त्यावर जिल्हाधिकारी यांनी चौकशी करणार असल्याचे सांगितले.
मात्र, आम्ही अवैध उत्खननावर कारवाई करण्याची मागणी केली होती. हा गंभीर विषय असताना आणि पर्यावरणाचा ऱ्हास करून कोट्यवधींचा शासनाचा महसूल बुडविला जात असताना देखील प्रशासनाने याठिकाणी पाहणी केली नाही. त्याएेवजी कणकवली तहसीलदारांना पाहणी व चौकशी करण्याचे पत्र दिले. त्यावरही अद्याप कारवाई झालेली नाही. त्यामुळे सोयीस्कररित्या मायनिंग माफियांना पाठीशी घातले जात असल्याचा संशय आहे. तर कर्तव्यात कसूर करून राज्य शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवत असल्याचा थेट आरोप केला. त्यामुळे १९ मे पर्यंत याठिकाणी पाहणी करून संबंधितांवर कडक कारवाई न केल्यास २० मे रोजी कणकवली प्रांताधिकारी कार्यालयासमोर उद्धवसेनेच्यावतीने धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला.