अवैध व्यवसायांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात थारा नाही, प्रशासनातील सडके आंबे दूर करु; पालकमंत्री नितेश राणे यांचा इशारा
By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: January 20, 2025 17:28 IST2025-01-20T17:28:27+5:302025-01-20T17:28:50+5:30
जिल्ह्यातील आगामी वाटचालीबाबत मांडली भूमिका

अवैध व्यवसायांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात थारा नाही, प्रशासनातील सडके आंबे दूर करु; पालकमंत्री नितेश राणे यांचा इशारा
सिंधुदुर्ग : ड्रुग्स मुक्त जिल्हा, गो माता तस्करी, मटका, जुगार यांसारख्या गोष्टी जिल्ह्यात यापुढे सहन केल्या जाणार नाहीत. बेकायदेशीर व्यवहार करणाऱ्यांनी आपला गाषा आताच गुंडाळावा, प्रशासनातील काही सडके आंबे आहेत ते दूर केले जातील. प्रत्येकाने आपल्याला दिलेली जबाबदारी पूर्ण करावी कोणावर अन्याय होणार नाही, मात्र कामचुकारपणा खपवून घेतला जाणार नाही असा इशारा राज्याचे मत्स्यवसाय तथा बंदरे विकासमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची धुरी हाती घेतल्यानंतर नितेश राणे सोमवारी पहिल्यांदाच दौऱ्यावर आले होते. जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील गाळ उपसासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत नितेश राणे यांनी विविध मुद्द्यांवर जिल्ह्यातील आगामी वाटचालीबाबत भूमिका मांडली. यावेळी माजी आमदार ॲड. अजित गोगटे, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, भाजपाच्या महिला जिल्हाप्रमुख श्वेता कोरगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिदन नाईक आदी उपस्थित होते.
मंत्री राणे म्हणाले, जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून वरिष्ठांनी दिलेली जबाबदारी मी आज स्वीकारली आहे. जिल्ह्यातील गाळ उपसाबाबत चर्चा झाली. पूर परिस्थिती निर्माण होणाऱ्या पहिल्या पाच ठिकाण आम्ही जिल्हा नियोजनातून निधी उपलब्ध करुन देऊन कामांना सुरूवात करणार आहोत. प्राधान्य क्रम ठरवून गाळ उपसा केला जाईल. प्रत्येक तालुक्याला न्याय दिला जाईल. ओरोसला नगरपंचायत पाहिजे अशी मागणी जनतेची आहे. त्यांची पूर्तता व्हावी म्हणून आपण प्रयत्नशील आहे. पर्यटनाला चालना मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
विकास आणि सुविधा दोन बाबी केंद्रस्थानी
२५ जानेवारीला कायदा सुव्यस्थेसाठी एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्याचा विकास आणि नागरिकांची सुविधा या दोन बाबी केंद्रस्थानी ठेवून काम करणार आहे. मागील सर्व पालकमंत्र्यांनी अतिशय सक्षमपणे काम केले आहे. त्यांचे मार्गदर्शन घेऊन जिल्ह्याच्या दरडोई उत्पनात वाढ करताना राज्यातील पहिल्या पाच क्रमांकात सिंधुदुर्गला आणण्याचा माझा प्रयत्न असेल.
कायदा, सुव्यवस्था महिला सुरक्षा महत्वाची
विरोधी पक्षाचा आमदार होता त्यावेळी मला किती चांगल वागवलं हे माझ्या लक्षात आहे. जनतेला कोण त्रास देत असेल तर माझ्याकडे अनुभव आहे. त्यापेक्षा जास्त अनुभव देईन. जिल्ह्यात कायदा सुव्यस्था आणि महिला सुरक्षा महत्वाची आहे. अवैध धंदे चालू देणार नाही मग ते माझ्या पक्षाचे असले तरी त्यांच्यावर कारवाई होणारच, असेही मंत्री राणे यांनी कडाडून सांगितले.
सी वर्ल्ड प्रकल्प लोकांना विश्वासात घेऊनच
मालवण तोंडवळी येथील प्रस्तावित सी वर्ल्ड प्रकल्पाबाबत आपण स्थानिक आमदार नीलेश राणे यांच्याशी चर्चा करून तेथील लोकांना विश्वासात घेऊनच सी वर्ल्ड प्रकल्प साकारला जाईल, असे पालकमंत्री नीतेश राणे यांनी सांगितले.
कामचुकारांना दिल्ला सज्जड दम
काही विषय पेंडिंग आहेत. ते पूर्ण करा अस जिल्हाधिकारी यांना सांगितले आहे. ज्यांना काम करायची इच्छा नसेल तर बदली करायला मी मदत करेन. प्रशासकीय कर्मचाऱ्यांना आता सुट्टी नाही. केंद्रात आणि राज्यात स्थिर सरकार आहे. अनेक योजना आहेत त्यांची अंमलबजावणी केली जाईल. सोमवार ते शुक्रवार कार्यालयीन वेळेत काम केलेच पाहिजे.
बीड लॉबीला इशारा
काही डंपर व्यावसायिकांची मुजोरी वाढली आहे. त्याला आपले प्रशासनही तेवढेच जबाबदार आहे. आपल्या जिल्ह्यात बीडची लॉबी काम करत आहे. असे आम्ही ऐकले आहे. त्यामुळे याची माहिती द्यावी असे मी जिल्हाधिकारी यांना सांगितले आहे.
विभाग नियंत्रकांसह, रिक्त पदांची मागणी
जिल्ह्यात मिनी बस मिळाव्यात अशी मागणी आपण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे. जिल्ह्यातील रिक्त असलेल्या एसटीच्या विभाग नियंत्रकांसह रिक्त पदांबाबत चर्चा झाली आहे. असेही राणे यांनी स्पष्ट केले.
दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार
कणकवलीमध्ये दोन बांगलादेशी महिलांना अटक झाली. मात्र, प्रत्यक्षात त्या महिलांना एका लॉजमध्ये पकडण्यात आले आणि पोलिसांनी कणकवली रेल्वे स्थानकावर त्यांना पकडले, असे भासविण्यात आले. या प्रकरणात जे आधिकारी दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री राणे यांनी स्पष्ट केले.