महेश सरनाईक दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने तिलारी वनक्षेत्रात 'थर्टी फस्ट'ची पार्टी करणाऱ्या अतिउत्साहींवर वन्यजीव संरक्षण अधिनियमाद्वारे कडक कारवाई करण्याचा इशारा दोडामार्ग वन परिक्षेञ अधिकारी वैशाली मंडल यांनी दिला आहे. यापूर्वी तिलारी वनसंवर्धन क्षेत्रात "थर्टी फस्ट" पार्टी केल्यामुळे अतिउत्साहींच्या काही चुकांमुळे वनक्षेत्रात हानी पोहोचलेली आहे.
वनक्षेत्रात चूल लावून जेवण तयार करणे, मद्यपान करणे, काचेच्या बाटल्या फेकणे, बाटल्या फोडणे, जंगलात प्लास्टिक व अन्य साहित्य टाकणे, आग लावणे, शिकार करणे, गोंगाट करणे तसेच लावलेल्या चुलीतील आग न विझवता निघून जाणे, असे प्रकार केल्यामुळे जंगलात वणवे लागतात याचा वन्यजीवांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे.
याची गंभीर दखल दोडामार्ग वन परिक्षेञ अधिकारी वैशाली मंडल यांनी घेऊन तिलारी राखीव संवर्धन क्षेत्र घाटीवडे बांबर्डे, आयनोडे, कोनाळ, तेरवण मेढे, शिरंगे, केंद्रे खुर्द बुद्रुक, इतर जंगलात २७ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान पार्टी करण्यास मज्जाव केला आहे.
जंगल परिसरात दिवसा व रात्री गस्त घालण्यात येणार आहे. तिलारी धरण परिसर व नदीकाठच्या वनक्षेत्राच्या ठिकाणी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर पर्यटक जमा होण्याची शक्यता आहे.
यावेळी वनक्षेत्रात विनापरवाना प्रवेश करून अनुचित प्रकार करणाऱ्या पर्यटकांवर भारतीय वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ व अधिनियम १९२७ अंतर्गत कारवाई करणेत येणार आहे.